
रायगड, 26 एप्रिल (हिं.स.)। रसायनी पोलीस ठाणे हद्दीत हिरानंदानी फॉरच्यून सिटी परिसरातील कन्स्ट्रक्शन साईटवर अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात सुमारे ६ लाख ३० हजार रुपयांचा माल चोरट्यांनी टेम्पोमधून लंपास केला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास भोकरपाडा, ता. पनवेल येथील हिरानंदानी फॉरच्यून सिटी कन्स्ट्रक्शन साईटवरील सोशल हाऊसिंग प्रकल्पात ही घटना घडली. १० ते १२ अज्ञात इसमांनी संगनमताने साईटवर प्रवेश करून फिर्यादी यांच्या परवानगीशिवाय मोठ्या प्रमाणात साहित्य टेम्पोमध्ये भरून नेले.
या चोरीमध्ये बांधकामासाठी लागणारे साहित्य व इतर माल असा एकूण ६,३०,००० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले आहे. पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्यामुळे सुरक्षेच्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६४/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३०३(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश बाचकर करीत असून अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)