
चंद्रपूर, 26 एप्रिल (हिं.स.)।
चंद्रपूर जिल्हा हा मागासलेला आदिवासी जिल्हा असून ९० टक्के लोक शेतीवर निर्वाह करतात. उपजीविकेचे एकमेव साधन शेती आहे. पण निसर्गाच्या लहरीपणामुळे दिवसेंदिवस शेती करणे व त्यावर संसार करणे कठीण झाले आहे. तेव्हा येथील तरुणांच्या, स्थानिकांच्या हाताला काम देण्याची गरज आहे. स्थानिकांसाठी कायमस्वरूपी आर्थिक व्यवस्था करणे महत्त्वाचे असल्याचे परखड मत माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी मुल येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले. दरम्यान गडचिरोली जिल्ह्यात उद्योग आल्यामुळे तेथील आदिवासींचे जीवनमान सुधारले, मग आम्ही मागे का राहावे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
मुल येथे उद्योग व मालधक्का यावरून काहींनी विरोध केला. यावरून वाद पेटलेला असताना आता शोभाताई फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
उपजीविकेचे दुसरे जंगलातील तेंदुपत्ता हे महत्त्वाचे साधन होते. यावर्षी तेंदुपत्ता चा लिलाव झाला नाही. अशा परिस्थितीत गरिबांचे भविष्य काय? त्याचा विचार करण्याची गरज शोभाताई फडणवीस यांनी प्रतिपादित केली. त्यामुळेच शेतमजुरांचे, तरुणांचे भविष्य घडवण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात उद्योग आणण्याचा निर्णय घेतला व त्याकरता जनतेचा सहभाग असावा म्हणून सह्यांची मोहीम सुरू केली. अवघ्या दहा दिवसात २५ हजार सह्या गोळ्या केल्या. त्यात मूल शहरातील १ हजार ५५० व ग्रामीण भागातील ३ हजार ४८३ सह्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रदूषणासाठी गाड्या, ट्रक मोठी वाहने गावातून जाव्या लागतात. आज कारखान्यांच्या, खाणीच्या सर्व गाड्या या चामोर्शी, चांदापूर फाटा, चांदली, ताडाळा, चिचाळा, कवडपेठ, चिरोली, केळझर अशा मार्गाने येतात. मूलशी त्याचा काही संबंध नाही, गाडी मूल येथे येत नाही. मूल- चंद्रपूर हा राष्ट्रीय महामार्ग मंजूर असून त्याची निविदा झालेली आहे. २०१७ पासून हा रस्ता वनविभागाकडे पडला होता, तो रस्ता झाल्यास अपघाताचे प्रमाण कमी होईल असे त्यांनी सांगितले. मालधक्का झाल्यास सर्व खाणी, कारखान्याच्या गाड्या या केळझरवरून सरळ रेल्वे स्टेशन वर येईल, तेव्हा येथे मूल गावाचा संबंध कुठे येतो असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुंबई ते रेल्वे लाईन हा बायपास मंजूर असून तो परवानगीसाठी वन विभागाकडे दिल्लीला गेला आहे. तो मंजूर झाल्यास एकही गाडी सुद्धा गावातून जाणार नाही असे त्यांनी नमूद केले.
मी राजकारणी नाही, मला राजकारणाचे डावपेच समजत नाही. मी एक सामाजिक कार्यकर्ती आहे. जनतेचे प्रश्न सोडवणे व त्यांना न्याय देणे ह्यातच मला आनंद आहे. १९७१ पासून सुरु झालेले हे माझे कार्य ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद ते आमदार मंत्री असे आहे. २६ वर्ष आमदार राहिल्यानंतर निवृत्त झाले, यापासून आजपर्यंत जनतेचे प्रश्न सोडवणे हेच माझे कार्य राहिले आहे आणि हेच आतापर्यंत असेच चालू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव