
अमरावती, 26 एप्रिल, (हिं.स.) - धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबावर महाराष्ट्रात बंदी घालावी, या मागणीसाठी अमरावती शहर काँग्रेस पक्ष आक्रमक झाली आहे. रविवारी 11 वाजता शहरात काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी बागेश्वर बाबाच्या प्रतिकात्मक छायाचित्राला जोडे मारून निषेध व्यक्त केला.
काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, राज्यातील सत्ताधारी सरकार अशा बाबांना अप्रत्यक्ष पाठबळ देत असून समाजात अंधश्रद्धा वाढीस लागते आहे. तसेच बागेश्वर बाबाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोपही करण्यात आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. जर सरकारने यावर योग्य कारवाई केली नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला. या आंदोलनामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याबद्दल धिरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांना महाराष्ट्रात येण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी,अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने याप्रसंगी करण्यात आली.दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज की जय,छत्रपती शिवाजी महाराज के सन्मान में काँग्रेस पार्टी मैदान में, छत्रपती शिवाजी महाराज का अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान,भोंदू बागेश्वरला संरक्षण देणाऱ्या भाजपा सरकारचा निषेध असो,भोंदू बागेश्वरला महाराष्ट्रात बंदी घाला अशा घोषणांनी संपूर्ण परिसरात कडाडून विरोध व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनात माजी पालकमंत्री डॉ सुनील देशमुख,शहराध्यक्ष बबलु शेखावत,मनपा विरोधीपक्षनेते विलास इंगोले,माजी महापौर मिलिंद चिमोटे,स्वीकृत नगरसेवक अनिल अग्रवाल,महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री वानखडे,नितीन काळे,निलेश गुहे,संकेत कुलट,विनोद मोदी,हाजी नजीर खान बी.के.,नगरसेवक विक्की वानखडे,नगरसेविका अर्चना आत्राम,नगरसेविका सुनीता भेले,नगरसेविका राजश्री जढाळे,मैथिली पाटील,वंदना निरगुडे,किरण चांदवडकर,गुड्डू हमीद,सलीमभाई मिरावाले, अभिनंदन पेंढारी,भैय्यासाहेब निचळ,प्रदीप अरबट,दीपक हुंडीकर यांच्या सह,महिला काँग्रेस,युवक काँग्रेस, सेवादल, एन.एस.यु.आय, इंटक, विविध विभाग व सेलच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी