रायगड - काळभैरव मंदिराचा नव्या रूपात लोकार्पण सोहळा; गाव एकोप्याचा आदर्श
रायगड, 26 एप्रिल (हिं.स.)। माणगाव तालुक्यातील पन्हळघर बुद्रुक येथे श्री काळभैरव मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्याने संपूर्ण गाव भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणाने भारावून गेले. हा सोहळा केवळ मंदिराच्या पुनर्बांधणीचा कार्यक्रम न ठरता, गावकऱ्यांच्या एको
Dedication ceremony of Kalbhairav Temple in a new form; A model of village unity


रायगड, 26 एप्रिल (हिं.स.)। माणगाव तालुक्यातील पन्हळघर बुद्रुक येथे श्री काळभैरव मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्याने संपूर्ण गाव भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणाने भारावून गेले. हा सोहळा केवळ मंदिराच्या पुनर्बांधणीचा कार्यक्रम न ठरता, गावकऱ्यांच्या एकोप्याचा, श्रद्धेचा आणि सामाजिक बांधिलकीचा जिवंत प्रत्यय देणारा ठरला.

सोहळ्यात गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण वर्ग, महिला आणि बालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. प्रत्येकाने आपल्या परीने योगदान देत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. ज्येष्ठांचे मार्गदर्शन, तरुणांचे नियोजन आणि महिलांची पूजाविधी, स्वच्छता व पाहुणचारातील सक्रिय भूमिका यामुळे संपूर्ण सोहळ्याला विशेष उंची प्राप्त झाली.

मंदिराच्या गाभाऱ्याची नव्याने करण्यात आलेली रचना भाविकांसाठी प्रमुख आकर्षण ठरली. पारंपरिक वास्तुशैली जपत आधुनिकतेची सांगड घालून साकारलेली ही रचना पाहताच भक्तांच्या मनात समाधान आणि शांततेची अनुभूती निर्माण होत होती. गाभाऱ्यातील प्रकाश आणि हवा यांचे संतुलित नियोजन भाविकांना प्रसन्न व सुखद अनुभव देणारे ठरत आहे.

तसेच मंदिर परिसरात स्वच्छता, शिस्तबद्ध व्यवस्था आणि आकर्षक सजावट यामुळे भक्तिमय वातावरण अधिक खुलून दिसत होते. मंदिराचा नवा अवतार पाहून ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान आणि अभिमान स्पष्टपणे झळकत होता.

या जीर्णोद्धार कार्यासाठी मुंबईकर मंडळी आणि ग्रामस्थांनी एकत्र येत केलेले योगदान विशेष उल्लेखनीय ठरले. त्यांच्या एकजुटीमुळे केवळ मंदिराचा कायापालट झाला नाही, तर गावातील सामाजिक आणि सांस्कृतिक एकात्मतेलाही नवी बळकटी मिळाली.

एकंदरीत, श्री काळभैरव मंदिराचा हा जीर्णोद्धार सोहळा प्रत्येक गावकऱ्याच्या मनात कायमचा ठसा उमटवणारा ठरला असून, भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande