रत्नागिरी : लावगण येथे गोवा शिपयार्डचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प - ॲड. दीपक पटवर्धन
रत्नागिरी, 26 एप्रिल, (हिं. स.) : केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत असलेल्या गोवा शिपयार्ड लिमिटेड या नामांकित कंपनीचा सुमारे २५०० कोटी रुपयांचा प्रकल्प जयगडनजीकच्या लावगण येथे उभारला जाणार आहे, अशी माहिती शिपयार्डचे स्वतंत्र संचालक अॅड. दीप
रत्नागिरी : लावगण येथे गोवा शिपयार्डचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प - ॲड. दीपक पटवर्धन


रत्नागिरी, 26 एप्रिल, (हिं. स.) : केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत असलेल्या गोवा शिपयार्ड लिमिटेड या नामांकित कंपनीचा सुमारे २५०० कोटी रुपयांचा प्रकल्प जयगडनजीकच्या लावगण येथे उभारला जाणार आहे, अशी माहिती शिपयार्डचे स्वतंत्र संचालक अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ या संकल्पनांना या प्रकल्पामुळे बळ मिळेल. लावगण परिसरात सुमारे १०० एकर जागेवर हा अत्याधुनिक प्रकल्प साकारला जाणार आहे. त्यासाठी जमीन उपलब्ध आहे. सध्या कंपनीकडून प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सुमारे ३ हजार स्थानिक युवक-युवतींना थेट रोजगार मिळेल, तर अप्रत्यक्षरित्या उद्योग आणि सेवाक्षेत्रातही संधी निर्माण होतील.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी रत्नागिरीचे सुपुत्र आणि गोवा शिपयार्डचे स्वतंत्र संचालक ॲड. दीपक पटवर्धन यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्यकाळातच प्रकल्पाला मंजुरी मिळणे हा जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत आणि मंत्री नीतेश राणे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.

देशाच्या संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे. या ठिकाणी अत्याधुनिक नौकाबांधणी, रडार प्रणाली आणि प्रगत तंत्रज्ञानावर आधारित कामे चालणार आहेत. त्यामुळे कोकणातील तांत्रिक शिक्षणाला आणि कौशल्य विकासाला चालना मिळेल.

गोवा शिपयार्ड कंपनीने नुकतीच आर्थिक क्षेत्रात मोठी झेप घेतली असून, कंपनीचा समावेश आता बी श्रेणीतून ‘ए’ श्रेणीत झाला आहे. ३०० कोटींहून अधिक नफा कमावणाऱ्या या कंपनीला नवरत्न दर्जा मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. लावगणचा हा प्रकल्प केवळ रत्नागिरीसाठीच नव्हे, तर राज्याच्या औद्योगिक नकाशावर ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande