
रायगड, 26 एप्रिल (हिं.स.)। वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना ‘गोल्डन अवर’मध्ये त्वरित उपचार मिळावेत आणि वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावी व्हावे यासाठी वाशी येथील न्यूईरा हॉस्पिटलने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. हॉस्पिटलतर्फे नवी मुंबई पोलिसांना २०० बॅरीकेट्सचे वितरण करण्यात आले असून, या उपक्रमामुळे शहरातील रस्ते सुरक्षेला मोठी चालना मिळणार आहे.
वाशी पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकऱ यांच्या उपस्थितीत हे बॅरीकेट्स पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी संबंधित अधिकारी तसेच हॉस्पिटलचे प्रतिनिधी उपस्थित होते. वाहतूक नियंत्रण अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी आणि अपघातप्रवण ठिकाणी सुरक्षा वाढवण्यासाठी या बॅरीकेट्सचा वापर करण्यात येणार आहे.
दरम्यान, न्यूईरा हॉस्पिटलने नुकतेच अत्याधुनिक ‘पॉली ट्रॉमा केअर सेंटर’ सुरू केले आहे. अपघात, स्ट्रोक किंवा गंभीर दुखापतींच्या रुग्णांना तातडीने उपचार देण्यासाठी हे केंद्र सज्ज आहे. येथे ‘ट्रायज’ प्रणालीद्वारे रुग्णांच्या प्रकृतीनुसार प्राधान्यक्रम ठरवून उपचार केले जातात, ज्यामुळे उपचारातील विलंब टाळण्यास मदत होते.
या सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी सहपोलीस आयुक्त संजय येनपुरे (आयपीएस) यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विविध तज्ज्ञ डॉक्टरांची टीम २४ तास उपलब्ध असून, अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा येथे रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
“आपत्कालीन परिस्थितीत वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन रुग्णांना त्वरित आणि योग्य उपचार मिळावेत, हा आमचा मुख्य उद्देश आहे. तसेच रस्ते सुरक्षेसाठी पोलिसांना सहकार्य करणे ही आमची सामाजिक जबाबदारी आहे,” असे मत डॉ. सुनील कुट्टी यांनी व्यक्त केले.
एकूणच, आरोग्यसेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा समतोल राखत न्यूईरा हॉस्पिटलचा हा उपक्रम नवी मुंबईतील नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)