
डोंबिवली, 26 एप्रिल (हिं.स.)।
देशातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या स्मारकासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी उपलब्ध दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संरक्षिका गीताताई गुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली परिसरात हजारो कल्याणकरांच्या उपस्थितीत हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.
देशातील पहिल्या महिला डॉक्टर असणाऱ्या डॉ. आनंदीबाई जोशी यांचे कल्याण शहरामध्ये भव्य स्मारक असावा अशी हजारो कल्याणकारांची जुनी मागणी होती. भाजप नेते आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सुरुवातीपासून ही मागणी लावून धरत त्यासाठी शासकीय स्तरावर सतत पाठपुरावा सुरूच ठेवला होता. विधानसभा निवडणुकी दरम्यान शिवसेना नेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी आमदार नरेंद्र पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळीही नरेंद्र पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोर कल्याणात डॉ. आनंदीबाई जोशी यांचे भव्य स्मारक करण्याची इच्छा व्यक्त करत त्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली होती. त्यावेळी देशातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या स्मारकासाठी आपण भरीव निधी उपलब्ध करून देऊ असा शब्द एकनाथ शिंदे यांनी पवार यांना दिला होता. त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळत या स्मारकासाठी तब्बल 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केल्याने आता हे स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नरेंद्र पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष आभार मानले आहेत.
या स्मारकाची संकल्पना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संरक्षिका गीता गुंडे आणि वनवासी कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय संघटन मंत्री सदाशिव देवधर यांच्या पुढाकारातून साकारण्यात येत आहे. हे स्मारक केवळ ऐतिहासिक ठेवा नसून महिलांसाठी प्रेरणास्थळ ठरणार असल्याचे यावेळी पवार यांनी स्पष्ट केले.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून देशातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवणाऱ्या डॉ. आनंदीबाई जोशी यांची प्रेरणादायी गाथा या स्मारकातून जिवंत ठेवली जाणार आहे. ही प्रेरणा केवळ कल्याण किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता देशातील प्रत्येक महिलेच्या मनात नवी उमेद निर्माण करेल, असा विश्वास माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केला आहे.
स्मारकात डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या जीवनकार्यावर आधारित माहिती, म्युरल्स आणि प्रेरणादायी दृश्यरूप मांडणी करण्यात येणार असून, महिलांना प्रोत्साहन देणारे एक सशक्त केंद्र म्हणून हे स्मारक उभे राहणार आहे. या भव्य स्मारकात महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये आधुनिक जिम, विविध कौशल्यांसाठी प्रशिक्षण केंद्र, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सुसज्ज ऑडीटोरियम यांचा समावेश असेल.
भूमिपूजन सोहळ्यासाठी महापौर ॲड. हर्षाली थविल चौधरी, उपमहापौर राहुल दामले, आमदार सुलभा गायकवाड, आमदार महेश चौगुले, भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब सर्वपक्षीय नगरसेवक, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi