
लातूर, 26 एप्रिल, (हिं.स.)। ‘एल निनो’मुळे यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज असून वाढत्या तापमानामुळे पाण्याचा वापर अत्यंत जपून करणे आवश्यक आहे. पाणी पुनर्भरण व बचत ही काळाची गरज बनली असल्याचे आवाहन लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त धनराज माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाभरात मुक्या प्राण्यांसाठी 300 पाणपोई सुरू करण्याचा संकल्प केला आहे. त्याअंतर्गत बामणी/भातांगळी येथे 15 पाणपोईंचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
आतापर्यंत 47 पाणपोई कार्यान्वित असून अनेक मुक्या प्राण्यांची तहान भागवली जात आहे.
या कार्यक्रमाला जि. प. उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, स्थायी समिती अध्यक्ष सचिन बंडापल्ले, पंचायत समिती सभापती श्रीकांत बैले, जि. प. सदस्य महादेव साळुंके, सरपंच परमेश्वर पाटील, उपसरपंच मारुती शिंदे, भागवत दिवटे, संजय ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमासाठी योगदान देणाऱ्या देणगीदारांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis