
रायगड, 26 एप्रिल (हिं.स.)। ट्रिपल सीट प्रवास आणि हेल्मेट न वापरण्याच्या निष्काळजीपणामुळे महाडमध्ये एका दुचाकी अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून दोघेजण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष पुन्हा एकदा समोर आले आहे.
महाड (एमआयडीसी) पोलीस ठाणे हद्दीत २५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास काळीजकोंड गावाजवळ पिरॅमल कंपनीसमोरील रस्त्यावर हा अपघात झाला. पॅशन प्रो (क्रमांक MH 06 BA 2843) या दुचाकीवर चालकासह तिघे जण ट्रिपल सीट प्रवास करत होते. विशेष म्हणजे तिघांपैकी कोणीही हेल्मेट घातलेले नव्हते.
दरम्यान, रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवित असताना मोटारसायकल घसरून पडली. या अपघातात चालकाला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला, तर मागे बसलेल्या दोघांना दुखापती झाल्या.
या प्रकरणी महाड (एमआयडीसी) पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३/२०२६ नोंद करण्यात आला असून मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४, १२८, १२९ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०६(१), २८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार प्रवीण राठोड करीत आहेत.
या घटनेतून स्पष्ट होते की, ट्रिपल सीट प्रवास आणि हेल्मेटचा अभाव हे केवळ नियमभंग नसून जीवघेणे ठरू शकते. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)