
लातूर, 26 एप्रिल, (हिं.स.)। शहरात सिंगल युज प्लास्टिकच्या वापरावर आळा घालण्यासाठी लातूर महानगरपालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. उपयुक्त वसुधा फड यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा पथकांनी विविध भागांतील किराणा दुकाने, फळ विक्रेते तसेच इतर आस्थापनांवर अचानक तपासणी केली.
या कारवाईदरम्यान बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्या व साहित्य जप्त करण्यात आले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून काही ठिकाणी तात्काळ दंड वसूल करण्यात आला. अधिकाऱ्यांनी दुकानदारांना पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या.
उपयुक्त वसुधा फड यांनी स्पष्ट केले की, शहर स्वच्छ व प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी सिंगल युज प्लास्टिकवर बंदीची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, नागरिकांनीही प्लास्टिकचा वापर टाळून कापडी किंवा पुनर्वापर करता येणाऱ्या पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन मनपाकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis