
देवळा, 26 एप्रिल, (हिं.स.) - नाशिक जिल्ह्यातील देवळा या शहरात मागील आठवड्यात सर्वांना चक्रावून सोडेल, असा प्रकार घडला. एखाद्या साऊथच्या सस्पेन्स चित्रपटाप्रमाणे या घटनेत पोलिसांचीही एन्ट्री झाली. आणि मग सुरु झाला एका चोरीचा तपास. हा तपास जसजसा पुढे सरकत गेला, त्याप्रमाणे पोलीसही थक्क होत गेले. परंतु, अखेर देवळा पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावलाच. ही कहाणी आहे २६ महिलांच्या मंगळसूत्रांची आणि पोलिसांच्या तपास कौशल्याची. सध्या नाशिक जिल्ह्यात ही २६ मंगळसूत्रांची कथा चर्चेत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, १९ एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील ग्रामदैवत दुर्गा मातेचा यात्रोत्सव होता. यात्रोत्सवास परिसरातील खेड्यापाड्यांमधूनही नागरिक येत असल्याने देवळा येथे त्या दिवशी मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढली होती. यात्रेच्या दिवशी निर्माण झालेल्या गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेतला. यात्रेतून २६ महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि दागिने लंपास झाले. एकाच दिवशी २६ महिलांचे मंगळसूत्र चोरीस गेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. दुसरीकडे, शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झालेते. या प्रकरणी २६ महिलांनी देवळा पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या होत्या
चोरीस गेलेले दागिने परत मिळवून देण्याची जोरदार मागणी करण्यात आली. पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. दरम्यान, चोरीच्या दिवशीच नागरिकांच्या सतर्कतेमुळे एका महिलेसह एका पुरुषाला संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते. पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांचा गुन्ह्यातील सहभाग उघड झाला. आणि त्यांना अटक करण्यात आली. याच चौकशीतून इतर साथीदारांचा धागा हाती लागल्याने तपास अधिक वेगाने पुढे नेण्यात आला.
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार शिला काळे (२४), कविता पवार (२५) आणि मोहन भोसले (२३) यांनी संगनमताने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार २३ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथे वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या मदतीने सापळा रचत तिन्ही संशयितांना जेरबंद करण्यात आले. चौकशीत त्यांनी गर्दीचा फायदा घेत महिलांचे मंगळसूत्र हिसकावल्याची कबुली दिली. या धडाकेबाज कारवाईदरम्यान पोलिसांनी स्विफ्ट डिझायर कार, पाच मोबाईल आणि ४४ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला.
नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या आदेशान्वये उपनिरीक्षक हर्षल भोळे, हवालदार सुधाकर बागुल, प्रशांत पाटील, धनंजय शिलावटे, ललिता शिरसाठ, तांत्रिक विश्लेषण पथकातील हेमंत गिलबिले, प्रदीप बहीरम तसेच देवळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सार्थक नेहेते, पोलीस उपनिरीक्षक हेमंत राऊत, हवालदार राहुल शिरसाठ, पोलीस नाईक दिलीप सोनवणे, संदीप चौधरी आदींनी ही कारवाई यशस्वी केली. मंगळसूत्र चोरीच्या मालिकेचा स्थानिक गुन्हे शाखा आणि देवळा पोलिसांनी उलगडा करत आंतरजिल्हा टोळीला जेरबंद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV