
लातूर, 26 एप्रिल, (हिं.स.) अवैध व्यवसायांवर कारवाईचा भाग म्हणून नांदेड परिक्षेत्रातील विशेष पथकाने अहमदपूर तालुक्यात जुगार अड्ड्यावर धाड टाकत १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सुमारे 5 लाख 87 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाला अहमदपूर तालुक्यातील काजळ हिप्परगा येथील विसावा बारच्या दुसऱ्या मजल्यावर जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानूसार पथकाने छापा टाकला असता, ‘तिर्रट’ नावाचा जुगार खेळताना १६ जण आढळून आले.
कारवाईदरम्यान आरोपींकडून 1 लाख 44 हजार 750 रुपयांची रोकड, 1 लाख 3 हजार रुपयांचे 14 मोबाईल फोन तसेच 3 लाख 40 हजार रुपयांच्या 6 दुचाकी असा एकूण 5 लाख 87 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्मिता जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस कर्मचारी प्रदीप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ आणि कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. पथकाच्या कामगिरीबद्दल पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी कौतुक केले आहे.
दरम्यान, अवैध व्यवसायांविरोधात माहिती देण्यासाठी ‘खबर’ हेल्पलाइन सुरू करण्यात आली असून नागरिकांनी 9150100100 या क्रमांकावर संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis