
रायगड, 26 एप्रिल (हिं.स.)। श्रीवर्धन मतदारसंघात सुरू असलेल्या विविध विकासकामांना गती देण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी शहर व तालुक्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देत कामांची प्रगती तपासली व संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.
भुवनाले तलाव, समुद्रकिनाऱ्यावरील धूप प्रतिबंधक बंधारा, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक ‘शिवसृष्टी’ तसेच पेशव्यांचे स्मारक अशा महत्त्वाच्या प्रकल्पांची पाहणी करण्यात आली. या कामांचा दर्जा समाधानकारक असल्याचे त्यांनी नमूद करत, काही प्रकल्प अधिक वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात नव्याने बसविण्यात आलेल्या डायलिसिस मशीनचे लोकार्पण खासदार तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या सुविधेमुळे परिसरातील रुग्णांना उपचारासाठी दूरवर जाण्याची गरज भासणार नाही, त्यामुळे स्थानिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
“तालुक्याचा सर्वांगीण विकास हा आमचा प्राधान्यक्रम असून, विकासकामांसाठी आवश्यक निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही,” असे आश्वासन खासदार तटकरे यांनी यावेळी दिले. तसेच विकासकामांची गुणवत्ता आणि वेळेत पूर्तता यावर विशेष भर देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले.
या पाहणी दौऱ्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच, श्रीवर्धन तालुक्यात विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी हा दौरा महत्त्वपूर्ण ठरल्याचे बोलले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)