
सोलापूर, 26 एप्रिल (हिं.स.)।
सोलापूर प्रभाग क्र. ५ मधील बाळे परिसरात वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडितीच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर आज आमदार विजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरण अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सततच्या खंडित वीजेमुळे नागरिक त्रस्त झाले असून, या समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी बैठकीत ठोस निर्णय घेण्यात आले.
या बैठकीत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मेंटेनन्सची कामे वेळेवर पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. झाडांच्या फांद्यांमुळे निर्माण होणारे अडथळे टाळण्यासाठी ट्री कटिंग मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच जीर्ण व धोकादायक झालेल्या विजेच्या तारा तातडीने बदलण्याचे आणि शक्य त्या ठिकाणी केबल बंचिंग करण्याचे आदेश देण्यात आले.
नागरिकांना तत्काळ सेवा मिळावी यासाठी कर्मचारी संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, रात्रपाळीसाठी कायमस्वरूपी दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे स्पष्ट निर्देश आमदार विजय देशमुख यांनी दिले. तक्रार प्राप्त होताच त्वरित प्रतिसाद देऊन समस्येचे निवारण करावे, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले.
या बैठकीस नगरसेवक शिवानंद पाटील, महावितरणचे सहाय्यक अभियंता शैलेश चिंचोलीकर, कार्यालयीन सहाय्यक बागवान आनंद भवर, राजेश दिड्डी, आण्णाराव रणशूर, तुषार अर्जुन, नागेश सुरवसे आदी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड