
नाशिक, 26 एप्रिल, (हिं.स.) एकाच कुटुंबातील आजी, मुलगा आणि नातू या तीन पिढ्यांनी एकाच दिवशी आपापले मृत्युपत्र नोंदवून अनोखा विक्रम प्रस्थापित केला असून, या आगळ्यावेगळ्या कामगिरीची नोंद इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. या विक्रमाचे मानकरी नाशिकचे अॅडव्होकेट महेंद्र एकबोटे ठरले असून, त्यांना तसेच मृत्युपत्र नोंदविणाऱ्या तिन्ही व्यक्तींना नुकतेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
याबाबत माहिती देताना 'लीगल शिल्ड' संस्थेचे अॅड. महेंद्र एकबोटे यांनी सांगितले की, मृत्युपत्र तयार करून त्याची नोंद करणे ही केवळ कायदेशीर प्रक्रिया नसून, व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबाच्या सुरक्षिततेची आणि आर्थिक स्थैर्याची हमी देणारी महत्त्वाची बाब आहे. योग्य पद्धतीने तयार केलेले मृत्युपत्र' भविष्यातील वाद व अडचणी टाळण्यास मोठी मदत करते. मृत्युपत्र नोंदणीची प्रक्रिया स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, सर्वप्रथम संबंधित व्यक्तीसोबत सविस्तर चर्चा करून मृत्युपत्राचा मसुदा तयार केला जातो. त्यानंतर 'लीगल शिल्ड'च्या नाशिक येथील कार्यालयातील स्टुडिओमध्ये मृत्युपत्र करणारी व्यक्ती व साक्षीदार इन कॅमेरा सही करतात. पुढे संबंधित व्यक्ती साक्षीदारांसह दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन मृत्युपत्राची अधिकृत नोंदणी करते. या द्विस्तरीय प्रक्रियेमुळे दस्तऐवजाची विश्वसनीयता आणि वैधता सुनिश्चित होते. मृत्युपत्राबाबत जनजागृती करण्यासाठी 'लीगल शिल्ड'तर्फे विविध समाजप्रबोधनपर उपक्रम नियमित राबविले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV