
रत्नागिरी, 26 एप्रिल, (हिं. स.) : देवरूख येथील विवाह समारंभ आटोपून हातखंबा येथे आपल्या घराकडे परतणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला पांगरी येथील अवघड वळणावर भीषण अपघात झाला. दुचाकीवरील ताबा सुटल्याने झालेल्या या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हातखंबा येथील तीन तरुण एका विवाह सोहळ्यासाठी देवरूख येथे गेले होते. लग्न आटोपून दुचाकीने ते दुपारी परतत असताना पांगरी येथील धोकादायक वळणावर चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकी थेट समोरील कठड्यावर जाऊन आदळली. अपघातात सुमित विलास कांबळे (वय ३५) आणि विकास काशीराम कांबळे (वय ३८, दोघेही हातखंबा) यांचा मृत्यू झाला, तर विलास चंद्रकांत कांबळे हे या अपघातात जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिका चालकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमी आणि मृतांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. ऐन लग्नसराईत दोन तरुण मुलांचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी