
परभणी, 26 एप्रिल, (हिं.स.)। पाथरी शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील शिवाजीनगर, शाहूनगर, नेताजीनगर, ओंकारनगर, शिक्षक कॉलनी परिसरातील नागरिकांनी सततच्या वीज समस्यांविरोधात ३० एप्रिल रोजी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. नगरपरिषदेचे उपाध्यक्ष आलोक चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वीज बिलांचा शंभर टक्के भरणा करूनही वारंवार वीज खंडित होणे, लो व्होल्टेज, अपुऱ्या सुविधा आणि ढिसाळ कारभारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. या संदर्भात २५ एप्रिल रोजी शिवाजीनगर येथील हनुमान मंदिरात नागरिकांची बैठक पार पडली. बैठकीत ३० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता हनुमान मंदिर येथून मोर्चाला सुरुवात करून बळवंत वाचनालय मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महावितरण (एमएसईबी) कार्यालयावर धडक देण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी नागरिकांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे. यामध्ये डीपीवरील वाढता लोड कमी करणे, सर्व डीपींची क्षमता वाढविणे, शिवाजीनगर व जाधव डीपी १०० केव्हीएवरून २०० केव्हीए करणे, शिक्षक कॉलनीतील डीपीची तातडीने दुरुस्ती, बळवंत वाचनालय परिसरात नवीन डीपी बसविणे, वीज लाईनवर एबी स्विचेस बसविणे, प्रभागात २० नवीन वीज खांब उभारणे, फ्युज कॉलसाठी संपर्क क्रमांक जाहीर करणे तसेच वीजपुरवठा खंडित झाल्यास प्रति तास ५० रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात येणार आहे.
पाणीपुरवठा सुरू होताच वीज खंडित होण्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त असून महिलां व ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा फटका बसत असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. या आंदोलनात महिला वर्गाचाही मोठा सहभाग अपेक्षित असून “बिल भरूनही सेवा नाही” या भावनेतून नागरिक एकवटल्याचे चित्र आहे.या आंदोलनाकडे महावितरण प्रशासन कसा प्रतिसाद देते, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis