
रत्नागिरी, 26 एप्रिल, (हिं. स.) : उन्हाळ्यात विजेच्या वाढत्या मागणीच्या कालावधीत आणि पावसाळी परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून वीज यंत्रणेशी संबंधित विविध देखभाल व दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे सध्या वेगात सुरु आहे. मात्र उन्हाचा तडाख्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी देखभाल व दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे संबंधित दिवशी सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान करावेत असे निर्देश मुख्यालयाकडून क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहेत. कोकण परिमंडळात त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती रत्नागिरी मंडळ कार्यालयातून देण्यात आली.
महावितरणची प्रामुख्याने पावसाळ्यात वीजयंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी तसेच वीजपुरवठा खंडित होणे व वीजसुरक्षेचे धोके टाळण्यासाठी वीज ग्राहकांना पूर्वसूचना देऊन देखभाल व दुरुस्तीची कामे राज्यभरात सध्या सुरू आहेत. साधारणतः मे महिन्याच्या अखेरीस सर्व कामे पूर्णत्वास जातात. मात्र सद्यःस्थितीत सकाळी १० ते दुपारी २ किंवा चार वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवत देखभाल व दुरुस्तीचे कामे सुरू आहेत. नागरिकांसाठी ही गैरसोयीची वेळ टाळण्यासाठी यापुढे संबंधित दिवशी वीजवाहिनीच्या पूर्वनियोजित देखभाल-दुरुस्तीचे काम यापुढे सकाळी ७ ते ११ दरम्यान करण्याचे निर्देश मुख्यालयाकडून देण्यात आले आहेत.
संबंधित वीजग्राहकांना नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एसएमएसद्वारे तसेच प्रसिद्धी माध्यमांद्वारे याबाबत कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्तीच्या पूर्वनियोजित कामांमध्ये प्रामुख्याने वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या छोट्या फांद्या तोडणे, तुटलेले पिन व डिस्क इन्सुलेटर्स बदलणे, वितरण रोहित्रे, फिडर पिलर, रिंगमेन युनिटचे अर्थिंग तपासणे, ऑइल फिल्ट्रेशन व ऑइल टॉपिंग अप, रोहित्राच्या वितरण पेटीची दुरुस्ती, नादुरुस्त लाइटनिंग अॅरेस्टर बदलणे, वीजखांब व तारांचे मजबुतीकरण, तारांमधील झोल काढणे, गंजलेले किंवा खराब झालेले वीजखांब बदलणे, जुन्या वीजतारा बदलणे, फिडर पिलरची साफसफाई व आवश्यकतेनुसार इन्सुलेशन स्प्रे मारणे, उच्च व लघुदाब वीजतारांना गार्डिंग करणे यासह उपकेंद्रातील ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जिंग, पॉवर ट्रान्सफॉर्मरची देखभाल व ऑइल टॉपिंग अप अशा व इतर विविध दुरुस्ती कामांसह वीजपुरवठ्याच्या पर्यायी यंत्रणा सज्ज करणे आदी कामे करण्यात येत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी