रत्नागिरी : विद्यार्थ्यांनी आत्मशोधातूनच यशाचा मार्ग शोधावा : अविनाश धर्माधिकारी
रत्नागिरी, 26 एप्रिल, (हिं. स.) : तुला काय येतं यावर जीवनाची इमारत उभी कर; तुला काय येत नाही, याचा विचार करण्यात आयुष्य वाया घालवू नकोस. प्रत्येक व्यक्तीची बुद्धी, क्षमता आणि आवड वेगळी असते. त्या क्षमतेचा शोध घेऊन त्याचे प्रकटीकरण करणे, हीच खरी शिक
चतुरंगचा कार्यक्रम


रत्नागिरी, 26 एप्रिल, (हिं. स.) : तुला काय येतं यावर जीवनाची इमारत उभी कर; तुला काय येत नाही, याचा विचार करण्यात आयुष्य वाया घालवू नकोस. प्रत्येक व्यक्तीची बुद्धी, क्षमता आणि आवड वेगळी असते. त्या क्षमतेचा शोध घेऊन त्याचे प्रकटीकरण करणे, हीच खरी शिक्षणाची व्याख्या आहे, असे विचार माजी सनदी अधिकारी व ‘चाणक्य मंडळ परिवार’चे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.

चतुरंग प्रतिष्ठानच्या कोकण अभ्यास वर्गाच्या दोन दिवसीय विद्यार्थी संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शनिवारी, दि. २५ एप्रिल रोजी उद्घाटन समारंभ पार पडला. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून यूजीसीचे माजी अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन उपस्थित होते. पुण्यातील मांडके हिअरिंग सर्व्हिसेसच्या श्रवणतज्ज्ञ डॉ. कल्याणी मांडके, वक्ते मंदार ओक यावेळी उपस्थित होते.

इंद्रायणी दीक्षित यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी चतुरंग प्रतिष्ठानच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाचा सविस्तर आढावा घेतला. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि व्यक्तिमत्त्व विकास घडविण्यासाठी संस्थेने केलेल्या कार्याचा त्यांनी उल्लेख केला. तसेच या दोन दिवसीय विद्यार्थी संमेलनात विविध विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्याने, चर्चासत्रे आणि संवाद सत्रांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली.

मंदार ओक यांनी चतुरंगच्या स्मरणिकेविषयी माहिती देताना सांगितले की, या स्मरणिकेमध्ये विद्यार्थ्यांच्या लेखनकौशल्याला वाव देण्यात आला असून विविध विषयांवर दर्जेदार लेखांचा समावेश आहे.

उद्घाटनपर भाषणात अविनाश धर्माधिकारी यांनी शिक्षण या विषयावर सखोल विचार मांडले. ते म्हणाले, शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकातील माहिती आत्मसात करणे नव्हे, तर स्वतःच्या अंतरंगात डोकावून स्वतःला ओळखणे होय. आपण कोण आहोत, आपल्यात कोणत्या क्षमता आहेत, आपण समाजासाठी काय करू शकतो, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण. भारतीय संस्कृतीने संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची भावना दिली आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना केवळ विचार नाही, तर जीवनपद्धती आहे. प्रत्येकाने अंत:करणातून भारताच्या आणि जगाच्या कल्याणाचा विचार करून जगणे, हीच खरी भारतीय संस्कृती आहे.

कार्यक्रमाला चिपळूण पालिकेचे माजी मुख्याधिकारी विशाल भोसले, दैनिक ‘सागर’च्या संपादक शुभदा जोशी, पालिकेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, विचारवंत डॉ. सागर देशपांडे, निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी या संमेलनाला उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निबंध कानिटकर यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande