
मुंबई, 27 एप्रिल (हिं.स.)। मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या नामांतराच्या प्रस्तावावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. गोरगरिब आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या या रुग्णालयाचे नाव बदलण्याच्या हालचालींना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र विरोध दर्शवला आहे. मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महानगरपालिकेला पत्र लिहून ब्रिटीश काळातील ‘किंग एडवर्ड मेमोरियल’ या नावाऐवजी भारतीय संस्कृतीशी सुसंगत असे ‘कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ हे नाव देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. विशेष म्हणजे, नवीन नावातून ‘केईएम’ हे संक्षिप्त रूप कायम ठेवले जाईल, असा दावा त्यांनी केला आहे. या प्रस्तावाला पालिकेच्या आरोग्य समितीकडून मंजुरी मिळाल्याची माहिती समोर येताच राजकीय वातावरण तापले आहे.
या निर्णयाविरोधात आमदार मिलिंद नार्वेकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हस्तक्षेपाची मागणी केली आहे. “जर केईएमचे नाव बदलत असाल, तर इतर ऐतिहासिक वास्तूंची नावेही बदलणार का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनीही आक्रमक भूमिका घेत समाजमाध्यमांवर मराठी जनतेला साद घातली आहे. मराठी मनानो मराठी जनानो, गप गार थंड बसा... तुमची मुंबई तुमच्या हाती राहिली आहे का? ती तर लोढाची झाली आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त करत या नामांतराच्या निषेधार्थ केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांच्या केबिनबाहेर निदर्शने करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. नाहीतर मुंबईचे लोढा मॅन्शन झालेच समजा, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, केवळ राजकीय स्तरावरच नव्हे तर वैद्यकीय क्षेत्रातूनही या निर्णयाला विरोध होत आहे. केईएममधील निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’नेही नामांतराच्या निर्णयावर आक्षेप घेत, डॉक्टर आणि तज्ज्ञांना विश्वासात न घेता असा निर्णय घेऊ नये, अशी भूमिका मांडली आहे.
या सर्व विरोधाला प्रत्युत्तर देताना मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. “ज्यांना नामांतराला विरोध आहे त्यांनी उघडपणे सांगावे की त्यांना किंग एडवर्डचे नाव आवडते. इंग्लंडमध्ये त्यांचे नाव ठेवावे, भारतात का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, नाव बदलले तरी ‘केईएम’ ही ओळख कायम राहील आणि रुग्णालयाच्या कार्यावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे.
एकूणच, केईएम रुग्णालयाच्या नामांतराच्या मुद्द्यावरून मुंबईत राजकीय वातावरण चांगलेच तापले असून येत्या काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule