
अमरावती, 27 एप्रिल (हिं.स.) |अमरावतीचे निवासी जिल्हाधिकारी संतोष काकडे यांना यंदाचा आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित 'राज्यस्तरीय कार्य गौरव' पुरस्कार जाहीर झाला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथील गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला व क्रीडा संस्थेच्या वतीने या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. दादाजी वंशपायन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. संस्थेचे अध्यक्ष अर्जुनराव फडके आणि सचिव फुलचंद्र रोकडे यांनी या निवडीबाबत अधिकृत माहिती दिली. ११ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
काकडे यांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीत सामाजिक बांधिलकी जपत राबवलेले विविध उपक्रम आणि त्यांच्या जनहितार्थ कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार, १ मे रोजी वैश्यपायनगर येथील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संतोष काकडे यांना हा सन्मान मिळाल्याबद्दल जिल्हा प्रशासन व सामाजिक स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी