
नाशिक, 27 एप्रिल (हिं.स.)।
: भद्रकाली येथील शिंगाडा तलाव परिसरात मोबाईलमध्ये मग्न असलेल्या एका १७ वर्षीय मुलाचा भीषण अपघात झाला आहे. घराच्या बाल्कनीत मोबाईलवर ‘सर्फिंग’ करत असताना अचानक तोल गेल्याने हा युवक थेट चौथ्या मजल्यावरून खाली कोसळला. अरबाज सलीम खान असे या मुलाचे नाव असून त्याची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.
प्राथमिक माहितीनुसार, भद्रकाली परिसरातील म्हसोबावाडीत राहणारा अरबाज सलीम खान आपल्या घराच्या बाल्कनीत होता. तो मोबाईलवर इंटरनेट सर्फिंग करण्यात इतका गुंग झाला होता की, आपण बाल्कनीच्या अगदी कडेला आहोत याचेही त्याला भान राहिले नाही. याच गडबडीत अचानक तोल जाऊन तो चौथ्या मजल्यावरून खाली कोसळला. खाली पडताना दुसऱ्या मजल्यावरील एका पत्र्याच्या शेडवर तो जोराने आदळला आणि त्यानंतर जमिनीवर पडला.
पत्रा फुटल्याचा मोठा आवाज झाल्याने शेजारी राहणारे धुगेस यादव यांनी तातडीने घराबाहेर धाव घेतली. त्यांना अरबाज रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला दिसला. यादव आणि इतर रहिवाशांनी वेळ न घालवता अरबाजला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबाजच्या डोक्याला, छातीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर सध्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. मात्र, अद्याप त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेच्या वेळी अरबाज घरात एकटाच होता, त्याचे कुटुंबीय काही कामानिमित्त बाहेर गेले होते. या घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. हा निव्वळ अपघात आहे की यामागे अन्य काही कारण आहे, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV