
नाशिक, 27 एप्रिल (हिं.स.) : “इच्छाशक्ती प्रबळ असेल तर गरिबी कधीच यशाच्या आड येत नाही,” हे वाक्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील राजेश्वरी विजय जाधव हिने आपल्या कर्तृत्वातून खरे ठरवले आहे. हमालीचे काम करणाऱ्या वडिलांच्या कष्टाचे चीज करत तिने पोलीस भरतीत यश मिळवले असून संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
राजेश्वरीचे वडील विजय जाधव गेल्या अनेक वर्षांपासून हमालीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी मुलीच्या शिक्षणात कोणतीही कमतरता भासू दिली नाही. हमालीतून मिळणाऱ्या मर्यादित उत्पन्नातून त्यांनी राजेश्वरीच्या शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्न केले.
वडिलांचे कष्ट जवळून पाहत राजेश्वरीने लहानपणापासूनच “खाकी वर्दी” मिळवण्याचा निर्धार केला होता. यासाठी तिने एका पोलीस भरती प्रशिक्षण अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. तेथे तिने शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी दिवस-रात्र कठोर मेहनत घेतली. अभाव असूनही जिद्द न हरता केलेल्या परिश्रमांचे फळ अखेर तिला मिळाले आणि तिची पोलीस दलात निवड झाली.
आपल्या भावना व्यक्त करताना राजेश्वरी म्हणाली, “माझ्या वडिलांनी काबाडकष्ट करून मला शिकवले. त्यांच्या मेहनतीचे चीज व्हावे म्हणून मी खूप कष्ट केले आणि त्यांचे स्वप्न पूर्ण केले.”
या यशामुळे विजय जाधव भावुक झाले. “मुलीने माझ्या कष्टाचे सोने केले,” अशी प्रतिक्रिया देताना त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले.
राजेश्वरीचे हे यश केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे तर आर्थिक अडचणींना सामोरे जाणाऱ्या अनेक तरुणींसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV