
अमरावती, 27 एप्रिल (हिं.स.) : आगामी जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात शिक्षकांचे प्रशिक्षण वेगाने सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या मोबाईल अॅपसाठी किमान अँड्रॉइड 12 प्रणाली अनिवार्य करण्यात आल्याने अनेक शिक्षक अडचणीत सापडले आहेत. विद्यमान मोबाईल निष्प्रभ ठरत असल्याने नव्याने मोबाईल खरेदी करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
‘बीवायओडी’ (Bring Your Own Device) धोरणांतर्गत शासनाकडून कोणतीही साधनसामग्री उपलब्ध करून न देता शिक्षकांनी स्वतःच्या मोबाईलवरच जनगणनेचे काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शासनाची जबाबदारी शिक्षकांवर टाकली जात असल्याची भावना शिक्षकांमध्ये वाढत आहे.
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या प्रशिक्षण सत्रांमध्ये जनगणनेची संपूर्ण प्रक्रिया शिक्षकांना समजावून सांगितली जात आहे. प्रत्येक शिक्षकाला ठरावीक क्षेत्र दिले जाणार असून, उन्हाळ्याच्या सुटीत 15 मे ते 16 जूनदरम्यान गावोगावी घरोघरी जाऊन माहिती संकलन करावे लागणार आहे.
या प्रक्रियेत कुटुंबातील सदस्यांची संख्या, वय, लिंग, शिक्षण, व्यवसाय, स्थलांतर, निवास स्थिती यासह विविध माहिती मोबाईल ऍपमध्ये नोंदवावी लागणार आहे. याशिवाय प्रत्येक घराचे जीपीएस लोकेशन, घराचा प्रकार, पाणी, वीज, शौचालय यांसारख्या मूलभूत सुविधांची माहितीही अपलोड करावी लागणार आहे. काही ठिकाणी घरांचे फोटो अपलोड करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे शिक्षकांनी सांगितले.
या संपूर्ण प्रक्रियेसाठी स्थिर इंटरनेट कनेक्टिव्हिटी, उच्च क्षमतेचा मोबाईल आणि अद्ययावत सॉफ्टवेअर आवश्यक असल्याने शिक्षकांवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे.
प्रशिक्षणार्थींमध्ये नाराजी
“जनगणना हे शासनाचे काम असताना त्यासाठीचा खर्च शिक्षकांनी का करावा?” असा सवाल शिक्षकांकडून उपस्थित केला जात आहे. ग्रामीण भागातील शिक्षकांना याचा अधिक फटका बसत असून, अद्ययावत मोबाईल नसल्याने आर्थिक ताण वाढत आहे. आवश्यक साधनसामग्री न देता सर्व जबाबदारी शिक्षकांवर टाकली जात असल्याने प्रशिक्षणार्थींमध्ये नाराजी वाढत असल्याचे चित्र आहे.
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी