
जळगाव,, 27 एप्रिल (हिं.स.) “माझं गाव – आरोग्य संपन्न गाव” अभियान आढावा बैठक पार पडली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, हे अभियान केवळ पुरस्कारासाठी नसून प्रत्येक गाव आरोग्यदृष्ट्या सक्षम करण्याची मोठी संधी आहे. जळगाव जिल्ह्याने या अभियानात राज्यात अव्वल स्थान मिळवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. राज्यात 1 एप्रिल 2026 पासून सुरू झालेल्या या अभियानाचा उद्देश प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण व सहज आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे हा आहे. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा बळकट करणे आणि संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी करणे हे यामागील प्रमुख ध्येय आहे. चांगली कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना “आरोग्य संपन्न ग्राम” पुरस्कार देऊन सकारात्मक स्पर्धा निर्माण केली जाणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी निर्देश देताना सांगितले की, प्रत्येक गावात आरोग्य सेवा घराजवळ पोहोचली पाहिजे. ग्रामपंचायत, महिला बचत गट, युवक मंडळे व स्थानिक संस्थांच्या सहभागातून हे अभियान जनआंदोलनात रूपांतरित करावे. माता व बाल आरोग्य, लसीकरण, पोषण व स्वच्छता याबाबत कोणतीही तडजोड न करता विशेष लक्ष केंद्रित करावे. तसेच पिण्यासाठी शुद्ध पाणी, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन व पर्यावरण संवर्धनावर ठोस काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे केले आवाहन
जिल्ह्यात तापमान 44 अंशांपर्यंत पोहोचल्याने हीट स्ट्रोक व डिहायड्रेशन टाळण्यासाठी आरोग्य विभागाने उपाययोजना कराव्यात. गावोगावी दवंडी देऊन जनजागृती करावी. नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे व डोक्याचे संरक्षण करावे. शेतकरी बांधवांनी शेतीची कामे सकाळी व संध्याकाळीच करावीत, असेही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी सांगितले की, “माझं गाव – आरोग्य संपन्न गाव” अभियान यशस्वी करण्यासाठी लोकप्रतिनिधी व लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आरोग्य सेवा अधिक गतिमान करून प्रत्येक गावापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत. सरपंच प्रतिनिधी म्हणून झुरखेडा येथील सरपंच सुरेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.स्वप्निल सांगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) भाऊसाहेब अकलादे, महिला बालकल्याण अधिकारी हेमंतराव भदाणे, तसेच सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर