अमरावती–परतवाडा महामार्गावरील कडुनिंबाच्या झाडांची जाळपोळ
अमरावती, 27 एप्रिल (हिं.स.) अमरावती–परतवाडा महामार्गावर गेल्या आठ दिवसांपासून कडुनिंबाच्या हिरव्यागार झाडांची खुलेआम जाळपोळ होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. शेकडो वर्षांची वनसंपदा असलेल्या या झाडांना अज्ञात व्यक्तींनी लक्ष्य केले असून,
महामार्गावरील कडुनिंबाच्या झाडांची जाळपोळ


अमरावती, 27 एप्रिल (हिं.स.)

अमरावती–परतवाडा महामार्गावर गेल्या आठ दिवसांपासून कडुनिंबाच्या हिरव्यागार झाडांची खुलेआम जाळपोळ होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. शेकडो वर्षांची वनसंपदा असलेल्या या झाडांना अज्ञात व्यक्तींनी लक्ष्य केले असून, या प्रकाराकडे संबंधित विभागांकडून पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी व नागरिकांकडून केला जात आहे. महामार्गालगत दुतर्फा उभ्या असलेल्या कडुनिंबाच्या झाडांमुळे परिसराला हिरवळ लाभली होती. मात्र, अलीकडच्या काळात या झाडांना जाणीवपूर्वक आग लावण्याचे प्रकार वाढले असून, त्यामुळे पर्यावरणीय संतुलनाला मोठा धोका निर्माण झाला आहे. या जाळपोळीमुळे केवळ झाडांचे नुकसान होत नाही, तर पक्षी, लहान जीवसृष्टी आणि परिसरातील हवा प्रदूषित होत आहे. विशेष म्हणजे, या गंभीर प्रकाराकडे वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. तसेच, या प्रश्नावर अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा सामाजिक संघटनांनीही पुढाकार घेतलेला दिसून येत नाही. जर याकडे वेळेत लक्ष दिले नाही, तर महामार्गालगतची संपूर्ण हिरवीगार वनसंपदा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने या प्रकाराची दखल घेऊन दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande