
लातूर, 27 एप्रिल (हिं.स.)। लातूर शहरातील कातपूर रोडवरील एका फार्मसी महाविद्यालयात बी.फार्मसी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी परीक्षा केंद्रप्रमुख व सहाय्यक प्राध्यापकाविरुद्ध विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शनिवारी २५ एप्रिल रोजी दुपारी ‘NM-45’ विषयाची परीक्षा होती. परीक्षा सुरू होण्यापूर्वी दुपारी १ वाजून २२ मिनिटांनी प्रश्नपत्रिका संगणक प्रणालीवरून डाउनलोड करण्यात आली. त्यानंतर अवघ्या २३ मिनिटांत, म्हणजेच १.४५ वाजता, ही प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर पोहोचल्याचे उघड झाले.या घटनेमुळे परीक्षेची गुप्तता भंग झाली असून संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यापीठाने तत्काळ याची दखल घेत प्राथमिक चौकशी केली असता प्रश्नपत्रिका बाहेर गेल्याचे स्पष्ट झाले.महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीनिवास बुमरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून केंद्रप्रमुख तथा सहाय्यक प्राध्यापक अतुल लिंबराज कदम यांच्याविरुद्ध ‘महाराष्ट्र परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक अधिनियम १९९२’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis