म्हसळा नगरपंचायतीत अपात्र ठरलेले 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगड, 27 एप्रिल (हिं.स.) : म्हसळा नगरपंचायतीतील सत्तासमीकरणांना पुन्हा एकदा मोठे वळण मिळाले असून अपात्र ठरवण्यात आलेले शिवसेनेचे सात नगरसेवक आता पुन्हा पात्र ठरले आहेत. नगरविकास खात्याच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून पुढील सत्
Big relief for Shiv Sena; Shock to NCP's calculations


रायगड, 27 एप्रिल (हिं.स.) : म्हसळा नगरपंचायतीतील सत्तासमीकरणांना पुन्हा एकदा मोठे वळण मिळाले असून अपात्र ठरवण्यात आलेले शिवसेनेचे सात नगरसेवक आता पुन्हा पात्र ठरले आहेत. नगरविकास खात्याच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून पुढील सत्तास्थापनेबाबत उत्सुकता वाढली आहे.

यापूर्वी पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून या सात नगरसेवकांवर कारवाई करत त्यांना अपात्र ठरवण्यात आले होते. त्या निर्णयामुळे म्हसळा नगरपंचायतीवरील सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेली होती. मात्र, आता नगरविकास खात्याच्या नव्या निर्णयानंतर हे नगरसेवक पुन्हा पात्र ठरल्याने शिवसेनेला मोठा दिलासा मिळाला आहे.

नोव्हेंबर 2025 मध्ये मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या पुढाकाराने म्हसळा नगरपंचायत शिवसेना (शिंदे गट)च्या ताब्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांतच राष्ट्रवादी काँग्रेसने राजकीय डावपेच रचत परिस्थिती आपल्या बाजूने वळवली होती. खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीवर पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकला होता.

सध्याच्या बदललेल्या परिस्थितीत दोन्ही पक्षांमध्ये सत्तेसाठी चुरस निर्माण झाली आहे. शिवसेना पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी हालचाली करणार का, की राष्ट्रवादी काँग्रेस आपला ताबा कायम राखणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

येत्या काही दिवसांत म्हसळा नगरपंचायतीतील सत्तानाट्याला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande