
नाशिक, 27 एप्रिल (हिं.स.)।
: अलीकडच्या काळात हृदय विकाराचे प्रमाण वाढते आहे. आम्ही कितीही तत्वज्ञान सांगितले तरी रुग्णाची प्रत्यक्ष काळजी तुमच्यासारखे हृदयविकार तज्ज्ञ घेत असतात. महाराष्ट्राचे आरोग्य राखण्यात हृदय विकार तज्ञाचे योगदान मोलाचे आहे असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. प्रकाश आबिटकर यांनी केले.
नाशिक येथे आयोजित हृदय विकारतज्ञांच्या राज्य स्तरीय परिषदेच्या औपचारिक उदघाट्न सोहळ्याला आबिटकर दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
हृदयविकार क्षेत्रातील नवनवीन संशोधन, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपचार पद्धतींची देवाणघेवाण करण्यासाठी 'कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया' (CSI) महाराष्ट्र शाखेच्या वतीने तीन दिवसीय 'CSI MAC 2026' वार्षिक परिषद नुकतेच पार पडली.
या परिषदेतील उदघाटन सत्रात आबीटकर बोलत होते. यावेळी
डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉ. विजय बंग, डॉ. आशिष देशपांडे, डॉ. गौरव वर्मा, आयोजन समितीचे सचिव हृदयरोग तज्ञ डॉ.मनोज चोपडा आदी उपस्थित होते.
'सरकार आणि खासगी डॉक्टर्स यांचा समन्वय असणे महत्वाचे आहे. त्यामुळे खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी देखील आपल्या काही सूचना असतील तर त्या अवश्य मांडाव्यात असे आबिटकर म्हणाले. नवनवीन तंत्रज्ञानाचा आपण उपचारांत उपयोग करता. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य अधिक सुदृढ आणि सशक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. याकामी सर्व डॉक्टर मंडळींचे सरकारला सहकार्य हवे असे आवाहनही त्यांनी केले. महात्मा फुले आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना, इ एस आय सी च्या योजनांमध्ये सर्व हॉस्पिटल्सने सहभागी व्हावे असे आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. योजनांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना मोफत आणि माफक दरात उपचार मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. याकरिता योजनांसाठी आपल्या हॉस्पिटलला रजिस्टर करा असे आवाहनही अबिटकर यांनी केले.
आयोजन समितीचे सचिव डॉ. चोपडा म्हणाले, छोट्या शहरांमधील हृदयविकार तज्ञाना हृदय विकारातील नवनवीन उपचार पद्धती, तंत्रज्ञानाची माहिती मिळावी आणि अलीकडेच्या आधुनिक पद्धतीने झालेल्या शस्त्रक्रियांची प्रात्यक्षिके पाहायला मिळावीत, अनुभवी हृदयविकार तज्ञाच्या ज्ञानाचा त्यांना लाभ मिळावा हा या परिषदेचा उद्देश आहे. राज्यात 650 कार्डीयाक सेंटर्स आणि 1 हजार 150 कार्डीओलॉजिस्ट आहेत. त्यापैकी 70 ते 80 टक्के कार्डीयाक सेंटर्स हे या कार्डीयोलॉजिस्टने स्वयंस्फूर्तीने व स्वतःच्या हिमतीवर सुरू केले आहेत. हा बदल महाराष्ट्रातील हृदयविकाराच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असल्याचे डॉ. चोपडा म्हणाले.
हृदय विकाराचा झटका आल्यास पहिल्या दीड तासात उपचार मिळाले तर रुग्णाच्या हृदयाची आणि आरोग्याची हानी टाळता येते. सुदैवाने हृदय विकार तज्ञानच्या उपलब्धतेचा लाभ रुग्णांना तात्काळ मिळू लागला ही देखील मोठी उपलब्धी आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारे अद्दयावत उपचार आता आपल्याकडेही तुलनेने कमी खर्चात शक्य होत असून यामुळे हृदयाचे आरोग्य जपले जात असल्याचे डॉ. गौरव वर्मा यावेळी म्हणाले.
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV