परभणीत पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे जनगणना प्रशिक्षण
परभणी, 27 एप्रिल (हिं.स.)। भारत सरकारच्या 16 व्या जनगणना अभियानांतर्गत पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे प्रगणक व पर्यवेक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी महानगरपालिका उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत जनगण
पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे जनगणना प्रशिक्षण; उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे यांचे मार्गदर्शन


परभणी, 27 एप्रिल (हिं.स.)।

भारत सरकारच्या 16 व्या जनगणना अभियानांतर्गत पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे प्रगणक व पर्यवेक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी महानगरपालिका उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत जनगणना प्रक्रियेत अचूकता, पारदर्शकता आणि जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित केले.

जनगणना कार्यासाठी प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी 10 मास्टर ट्रेनर्सची नियुक्ती करण्यात आली असून प्रशासकीय अधिकारी नानासाहेब कुलकर्णी, प्रा. सुदर्शन खनगे, उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे, संदीप कुलकर्णी, विकास रत्नरपारखे, राजुकुमार जाधव, रामेश्वर कुलकर्णी, मंजूर हसन, अरशद आयुब, दिनेश भांडे, सोहेल सिद्दीकी, हेमंत दाफेकर, राहुल दुथडे, बालाजी सोनुने, पवन देशमुख, संस्कार तोडसे, रिजवान पठाण आदींचा सहभाग होता. यंदाच्या जनगणनेत प्रथमच डिजिटल सेन्सस आणि ‘स्व-गणना’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत नागरिकांना मोबाईल किंवा संगणकाद्वारे आधार कार्ड अथवा मोबाईल क्रमांकाच्या सहाय्याने स्वतःची माहिती पोर्टलवर नोंदविता येणार आहे. परभणी जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागासाठी एकूण 2 हजार 486 परिगणना गट तयार करण्यात आले असून 2 हजार 677 प्रगणक आणि 454 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 27 एप्रिल ते 8 मे दरम्यान प्रशिक्षण प्रक्रिया चार्ज अधिकारी, तहसीलदार आणि मुख्याधिकारी स्तरावर राबविण्यात येणार आहे.यावेळी नागरिकांमध्ये स्व-गणनेबाबत व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले. घंटागाडी, कचरा गाडी, मंदिरांचे ध्वनिक्षेपक, वर्तमानपत्रे, केबल नेटवर्क, ऑटो, चित्रपटगृहे, बसस्थानके, रेल्वे स्थानके, बँका, पोस्ट कार्यालये, शाळा आणि आठवडी बाजार अशा विविध माध्यमांतून प्रचार-प्रसिद्धी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शासकीय कार्यालये, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून स्व-गणना पूर्ण करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande