श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन कामे 17 मेपर्यंत पूर्ण करा- जिल्हाधिकारी
सोलापूर, 27 एप्रिल (हिं.स.) : अधिक मासानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्याने मंदिर परिसरातील सुविधा तातडीने सुधारण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्तिकीयेन एस यांनी दिल्या आहेत. मंदिर जतन व संवर्
Collctor


सोलापूर, 27 एप्रिल (हिं.स.) : अधिक मासानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्याने मंदिर परिसरातील सुविधा तातडीने सुधारण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्तिकीयेन एस यांनी दिल्या आहेत. मंदिर जतन व संवर्धन आराखड्या अंतर्गत बाजीराव पडसाळी परिसरात सुरू असलेली कामे 17 मेपर्यंत गुणवत्तापूर्ण व वेगाने पूर्ण करावीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

भक्तनिवास येथे झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी ही सूचना दिली. या बैठकीस मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, नगराध्यक्षा तथा पदसिद्ध सदस्या प्रणिता भालके, प्रांताधिकारी सचिन इथापे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, तहसीलदार सचिन लंगुटे तसेच मंदिर समितीचे सदस्य, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि पुरातत्त्व विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.जिल्हाधिकाऱ्यांनी व्यंकटेश्वर मंदिर, महालक्ष्मी मंदिर आणि कव्हर शेडची कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कामांच्या गतीसाठी कंत्राटदारांनी अधिक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे तसेच प्रकल्पात कोणतीही दिरंगाई होऊ नये, असेही त्यांनी सांगितले. मंदिर परिसरात पाण्याची गळती होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेण्याचे आणि दगडी कोटिंगची कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

महालक्ष्मी मंदिराच्या भिंतींना ओलावा येत असल्याबाबत तातडीने पाहणी करून उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच पश्चिमद्वाराचे कामही तात्काळ सुरू करण्याची सूचना करण्यात आली. प्रांताधिकारी आणि कार्यकारी अधिकारी यांनी दररोज कामांचा आढावा घ्यावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी अधिक मासातील भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता कव्हर शेडचे काम तातडीने पूर्ण करण्याची गरज व्यक्त केली. तसेच महालक्ष्मी आणि बालाजी मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेसाठी संबंधित मंदिरांची कामे लवकर पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले.बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्तिकीयेन एस यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

----------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande