वडगाव कोल्हाटी येथील जल जीवन मिशन योजनेतील कामे तातडीने पूर्ण करा – विभागीय आयुक्त जी. श्रीकांत
छत्रपती संभाजीनगर, 27 एप्रिल (हिं.स.)। मौजे वडगाव कोल्हाटी येथे ३७ कोटी रुपयांच्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर निधीनुसार प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पिण्याचे पाणी वेळेत पोहोचणे अत्यावश्यक आहे. यासाठी संबंधित कामे विनाअडथळा तातडीने सुरू करून प
वडगाव कोल्हाटी येथील जल जीवन मिशन योजनेतील कामे तातडीने पूर्ण करा – विभागीय आयुक्त जी. श्रीकांत


छत्रपती संभाजीनगर, 27 एप्रिल (हिं.स.)।

मौजे वडगाव कोल्हाटी येथे ३७ कोटी रुपयांच्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर निधीनुसार प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पिण्याचे पाणी वेळेत पोहोचणे अत्यावश्यक आहे. यासाठी संबंधित कामे विनाअडथळा तातडीने सुरू करून पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली वडगाव कोल्हाटी (बजाजनगर परिसर) येथील जल जीवन मिशन पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनिषा पलांडे, अधीक्षक अभियंता दीपक कोळी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत म्हणाले की, वडगाव कोल्हाटी परिसरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता नागरिकांना विहित कालावधीत शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणे गरजेचे आहे. यासाठी पाईपलाईन टाकणे आणि पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम ही कामे कोणत्याही अडथळ्याविना तातडीने हाती घेऊन पूर्ण करावीत. तसेच वाढत्या नागरीकरणामुळे परिसरात निर्माण झालेल्या कचऱ्याच्या प्रश्नाकडेही गांभीर्याने लक्ष देऊन त्याचे योग्य व्यवस्थापन करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी मुख्य अभियंता मनिषा पलांडे यांनी पाईपलाईन व जलटाक्या उभारण्यासाठी सिडकोकडे जागेची मागणी करण्यात आली असून जमीन उपलब्ध करून घेण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. जागा मिळताच कामांना त्वरित सुरुवात करण्यात येईल. असे सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande