
अमरावती, 27 एप्रिल (हिं.स.) जिल्ह्यातील दर्यापूर शहरात पुन्हा एकदा चड्डी बनियन गँगची दहशत पाहायला मिळाली आहे. गौरक्षण चौक परिसरातील तळोकार ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानात मध्यरात्री चोरीचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना रात्री 3 ते 3.30 वाजण्याच्या सुमारास घडली.माहितीनुसार, 10 ते 12 अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर फोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र शटर तुटताच दुकानात बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणेतील सेन्सर सक्रिय झाले आणि जोरदार सायरन वाजू लागला. अचानक मोठा आवाज झाल्याने चोरटे घाबरले आणि कोणतीही चोरी न करता घटनास्थळावरून तात्काळ पळ काढला.या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, घटनास्थळाजवळच जेस्तंभ चौकात पोलीस पेट्रोलिंग गाडी उपस्थित असतानाही चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याने पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.दर्यापूर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या घटनेमुळे शहरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी