
अमरावती, 27 एप्रिल (हिं.स.) : उन्हाचा तडाखा वाढत असतानाच फळप्रेमींसाठी एक गोड आनंदाची बातमी समोर आली आहे. फळबाजारात कोकणचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘देवगड हापूस’ आंब्याचे दणक्यात आगमन झाले असून बाजारात आंब्यांचा सुगंध दरवळू लागला आहे.देवगड हापूससोबतच केशर, दशहरी, लंगडा आणि बैगनपल्ली यांसारख्या विविध जातींचे आंबेही बाजारात दाखल झाले आहेत. यामुळे फळबाजारात रंगतदार वातावरण निर्माण झाले आहे.
यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच देवगड हापूसने चांगलाच भाव खाल्ला असून उत्कृष्ट चव आणि आकर्षक रंगासाठी प्रसिद्ध असलेला हा आंबा सध्या १२०० ते १४०० रुपये प्रति डझन दराने विकला जात आहे. दर जरी जास्त असले तरी ग्राहकांकडून हापूसला मोठी मागणी आहे.
इतर आंब्यांचे दरही वाढलेले दिसत आहेत. केशर आंबा २०० रुपये प्रति किलो, लंगडा २०० रुपये, दशहरी १५० रुपये, तर बैगनपल्ली ८० ते १०० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे.
महागाई आणि उष्णतेची लाट असूनही आंब्यांप्रती असलेले आकर्षण कमी झालेले नाही. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आणि उन्हाळ्याची गोडी वाढवण्यासाठी ग्राहक फळबाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.
दरम्यान, वाढत्या तापमानाचा परिणाम आंबा उत्पादनावरही जाणवत आहे. बागांमधील फळांना उष्णतेचा फटका बसल्याने आवक कमी झाली आहे. त्यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने दरांमध्ये वाढ झाल्याचे फळ विक्रेते प्रमोद काळे यांनी सांगितले.
फळप्रेमींसाठी हा हंगाम जरी महाग असला तरी आंब्याचा स्वाद बाजारात पुन्हा एकदा उत्साह घेऊन आला आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी