
नाशिक, 27 एप्रिल (हिं.स.) : शहरातील मराठा विद्या प्रसारक समाज संचलित डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय येथे सोमवारी दुपारी घडलेल्या लिफ्ट अपघातात एक महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली आहे. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे.
ज्योती शिवाजी आहिरे (वय 50, रा. मानेनगर, अमृतधाम) असे जखमी महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्या महाविद्यालयाच्या पहिल्या मजल्यावर साफसफाईचे काम करत होत्या. ऑपरेशन थिएटरमधील साहित्य ने-आण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लिफ्टचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून त्या आत डोकावून पाहत असताना अचानक वरून लिफ्ट खाली आली.
या धक्कादायक घटनेत लिफ्टचा जोरदार तडाखा बसल्याने त्यांच्या डोक्याला व मानेस गंभीर दुखापत झाली असून मणक्यालाही इजा झाली आहे. त्यांचा रक्तदाब मोठ्या प्रमाणात घसरल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. घटनास्थळी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर महाविद्यालय प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. आडगाव पोलीस यांनी घटनास्थळी दाखल होत तातडीने चौकशी सुरू केली आहे. लिफ्टचा दरवाजा उघडा कसा राहिला, तसेच तांत्रिक बिघाड झाला होता का, याचा तपास केला जात आहे.
या घटनेमुळे शहरातील लिफ्ट सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून संबंधित यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV