
छत्रपती संभाजीनगर, 27 एप्रिल (हिं.स.)। डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी-२०२६ सत्रातील बी.ए., बी.कॉम. व बी.एस्सी. प्रथम वर्षाच्या (प्रथम व द्वितीय सत्र) परीक्षा ६ ते ८ मे दरम्यान संपणार आहेत. 'होम सेंटर' व 'होम असेसमेंट' पद्धतीने घेण्यात येणाऱ्या या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन वेळेत पूर्ण करून निकाल विद्यापीठ स्तरावर घोषित करण्यासाठी परीक्षा व मूल्यमापन मंडळाने वेळापत्रक निश्चित केले आहे.
या निर्णयानुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ व २०२५-२६ पासून प्रथम वर्षाच्या परीक्षांसाठी ही पद्धत लागू केली. परीक्षा आयोजन, उत्तरपत्रिका तपासणी व निकालप्रक्रिया पूर्णपणे महाविद्यालयांनीच पार पाडायची आहे. मूल्यमापन पूर्ण झाल्यानंतर उत्तरपत्रिका, गुणयाद्या व इतर आवश्यक कागदपत्रे निश्चित वेळापत्रकानुसार विद्यापीठाकडे सादर करणे बंधनकारक केले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी १ जून, जालना २ जून, बीड ३ जून, तर धाराशिव ४ जूनपर्यंत सर्व कागदपत्रे राजर्षी शाहू महाराज परीक्षा भवन येथे जमा करावी लागणार आहेत. विद्यापीठाने निकाल जाहीर करण्याचाही अंदाजित कालावधी स्पष्ट केला आहे. त्यानुसार बी.ए. व बी.एस्सी.चे निकाल ६ जून, तर बी.कॉम.चा निकाल ८ जूनपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे, असे संचालक यांनी कळविले आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis