समृद्धी महामार्ग भूसंपादनावरून सेलू तालुक्यात शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
परभणी, 27 एप्रिल (हिं.स.) : जालना-नांदेड समृद्धी महामार्गासाठी सुरू असलेल्या सक्तीच्या भूसंपादन प्रक्रियेविरोधात सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाकडून अत्यल्प दरात आणि हुकूमशाही पद्धतीने जमिनी संपादन केल्या जात अस
समृद्धी महामार्ग भूसंपादनावरून सेलू तालुक्यात शेतकऱ्यांचा तीव्र विरोध


परभणी, 27 एप्रिल (हिं.स.) : जालना-नांदेड समृद्धी महामार्गासाठी सुरू असलेल्या सक्तीच्या भूसंपादन प्रक्रियेविरोधात सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाकडून अत्यल्प दरात आणि हुकूमशाही पद्धतीने जमिनी संपादन केल्या जात असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रस्तावित महामार्गासाठी त्यांच्या सुपीक शेतीजमिनी तसेच फळबागा संपादित केल्या जात आहेत. मात्र, यासाठी केवळ 18 लाख 80 हजार रुपये प्रति हेक्टर इतका मोबदला दिला जात असून हा दर बाजारभावाच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

रेडी रेकनर दर हा प्रत्यक्ष बाजारभाव नसल्याने प्रशासनाने वस्तुस्थिती लक्षात घेऊन योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.या निवेदनावर रामेश्वर गाडेकर, अनिरुद्ध नाईक, दत्ता देशमाने, प्रशांत नाईक, गणेशराव मुंडे, सोनू खरात, पंजाब गाडेकर, बाळासाहेब गाडेकर, रमेशराव माने यांसह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

आंदोलनाचा इशारा

प्रशासनाने लोकशाही पद्धतीने चर्चा न करता जबरदस्तीने निर्णय लादल्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होईल, असा इशाराही देण्यात आला आहे. हा निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगत तो हाणून पाडू आणि गरज पडल्यास तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

योग्य तोडगा निघेपर्यंत भूसंपादन प्रक्रिया थांबवावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande