
रायगड, 27 एप्रिल (हिं.स.)। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग येथे “ओलावा सामाजिक संस्था” पेण यांच्या वतीने महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात महत्त्वपूर्ण जनजागृतीपर कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेस डॉ. भावना भारंबे, डॉ. संतोष हराळकर, डॉ. नाझिया खान, डॉ. संतोष वाघमोडे व डॉ. रुपाली कवितके यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, डॉक्टर आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यशाळेत आरोग्य, सामाजिक जबाबदारी आणि महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भातील विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. संस्थेच्या प्रतिनिधींनी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
विशेषतः महिलांच्या हक्कांविषयी जागरूकता, कार्यस्थळी सुरक्षित वातावरणाची निर्मिती आणि सामाजिक संवेदनशीलता वाढविण्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन अंतर्गत तक्रार समितीमार्फत अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
शेवटी समाजसेवा अधीक्षक हर्षा जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानून भविष्यातही अशा जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)