गडचिरोलीत विकास योजनांचा आढावा – शेवटच्या नागरिकांपर्यंत लाभ पोहोचवण्यावर भर
गडचिरोली, 27 एप्रिल (हिं.स.) : गडचिरोली जिल्ह्यात शासकीय योजनांचे लाभ आता अधिक सुलभरीत्या नागरिकांपर्यंत पोहोचत असून, यंत्रणांनी कोणत्याही तांत्रिक अडचणींचे कारण न देता थेट शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचवावा, अशा सूचना खासदार डॉ. नामदेव कि
दिशा कमिटी बैठकीत आढावा घेतांना मान्यवर


गडचिरोली, 27 एप्रिल (हिं.स.) : गडचिरोली जिल्ह्यात शासकीय योजनांचे लाभ आता अधिक सुलभरीत्या नागरिकांपर्यंत पोहोचत असून, यंत्रणांनी कोणत्याही तांत्रिक अडचणींचे कारण न देता थेट शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचवावा, अशा सूचना खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) आढावा बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, तसेच ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी राहुल काळभोर उपस्थित होते.

विविध योजनांचा सविस्तर आढावा

बैठकीत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान आणि मध्यान्ह भोजन योजनेसह विविध केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा घेण्यात आला. पोषण आहाराच्या विलंबित वितरणावर चिंता व्यक्त करत, धान्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ नये यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत घरोघरी कचरा संकलन अधिक काटेकोरपणे करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रलंबित घरकुल हप्ते तातडीने वितरित करण्यावर भर देण्यात आला. काही लाभार्थ्यांचे हप्ते तांत्रिक कारणांमुळे अडकले असल्याचे निदर्शनास आणून त्यावर त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले.

रोजगार आणि पायाभूत सुविधांवर भर

दीन दयाल अंत्योदय योजना आणि दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेद्वारे ग्रामीण युवकांना स्वावलंबी बनवण्याचे आवाहन करण्यात आले.

राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांबाबतही चर्चा झाली. आष्टी ते आलापल्ली मार्गावरील प्रगतीचा आढावा घेत, लगाम ते आलापल्ली भागातील काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच आलापल्ली ते सिरोंचा रस्त्याच्या कामातील दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त करत निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाईचे संकेत देण्यात आले.

प्रशासनाला गती देण्याचे निर्देश

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी विविध शासकीय उपक्रमांची माहिती सादर केली. लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदारसंघातील समस्या मांडून तातडीने निराकरणाची मागणी केली. या सर्व तक्रारींची त्वरित दखल घेण्याचे निर्देश खासदार किरसान यांनी दिले.

बैठकीस विविध विभागांचे अधिकारी आणि समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande