गडचिरोलीत रानटी हत्तींचा कहर: ३३ हत्तींच्या कळपाकडून पिकांचे मोठे नुकसान
गडचिरोली., 27 एप्रिल (हिं.स.)। गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रानटी हत्तींच्या कळपाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. छत्तीसगड सीमा ओलांडून आलेल्या ३३ रानटी हत्तींच्या कळपाने आता आपला मोर्चा गडचिरोली तालुक्यातील उसेगाव परिसराकडे वळवला असून,
हत्तीच्या कळपाचा संग्रहित फोटो


गडचिरोली., 27 एप्रिल (हिं.स.)। गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रानटी हत्तींच्या कळपाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. छत्तीसगड सीमा ओलांडून आलेल्या ३३ रानटी हत्तींच्या कळपाने आता आपला मोर्चा गडचिरोली तालुक्यातील उसेगाव परिसराकडे वळवला असून, एका रात्रीत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली उभी पिके उद्ध्वस्त केली आहेत. या घटनेमुळे परिसरात प्रचंड घबराट पसरली असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा ३३ हत्तींचा मोठा कळप गेल्या दोन दिवसांपासून उसेगाव आणि लगतच्या जंगल परिसरात ठाण मांडून आहे. गुरुवारी मध्यरात्री या कळपाने शेतात प्रवेश केला. भात पिकाची कापणी जवळ आलेली असतानाच हत्तींनी पिके पायाखाली तुडवून आणि खाऊन फस्त केली. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हत्तींच्या ओरडण्याने आणि आवाजामुळे रात्री गावकऱ्यांची झोप उडाली आहे. हत्ती मानवी वस्तीत घुसण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाकडून गावकऱ्यांना रात्रीच्या वेळी घराबाहेर न पडण्याच्या आणि शेतात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

याबाबत माहिती मिळताच वनविभागाचे पथक आणि विशेष 'हुल्ला' पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. फटाके फोडून आणि मशाली पेटवून हत्तींना मानवी वस्तीपासून दूर हाकलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कळप मोठा असल्याने आणि हत्ती आक्रमक असल्याने त्यांना नियंत्रणात आणणे कठीण होत आहे. वर्षभर कष्ट करून पिकवलेले धान आता कापणीला आले होते. पण हत्तींनी सर्व काही नष्ट केले. सरकारने तातडीने पंचनामे करून आम्हाला आर्थिक मदत द्यावी, अशी आर्त हाक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande