
गडचिरोली, 27 एप्रिल (हिं.स.) : जिल्ह्यात वाढत्या उष्माघाताच्या घटनांचा विचार करून नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) सेवा वेळेत तात्पुरता बदल केला आहे.
नवीन नियमानुसार योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण तसेच पक्की अनुज्ञप्ती (ड्रायव्हिंग लायसन्स) चाचणीच्या सेवा आता सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत आणि दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहेत. मात्र दुपारी 12 ते 4 या वेळेत तीव्र उष्णतेमुळे सर्व प्रक्रिया पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत.
हा निर्णय नागरिक तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने घेण्यात आला असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी सांगितले.
जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी नवीन वेळापत्रकाची नोंद घेऊनच कार्यालयीन सेवा घ्याव्यात, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond