
लातूर, 27 एप्रिल (हिं.स.)।गोसंरक्षण, गोसंवर्धन आणि गोसन्मानाचा जाज्वल्य संदेश देणारी गो सन्मान अभियान अंतर्गत भव्य दिंडी यात्रा सोमवारी लातूरमध्ये अभूतपूर्व उत्साहात आणि मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत संपन्न झाली. 'माँ पुकार रही है' या भावनिक संदेशाने प्रेरित होऊन हजारो नागरिकांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला.
सोमवार, दि. २७/०४/२०२६ रोजी सकाळी ९ वाजता श्री हनुमान चौक, लातूर येथून दिंडी यात्रेला प्रारंभ झाला. ही दिंडी तहसील कार्यालय, लातूर येथे पोहोचून संपन्न झाली. दिंडीत सुमारे २०० गोवंश सहभागी झाले होते. वारकरी संप्रदायातील भाविक, श्री राम-लक्ष्मण-सीता विराजमान असलेला आकर्षक रथ तसेच गोमातेचा विशेष रथ यामुळे यात्रेचे स्वरूप अधिक भव्य आणि लक्षवेधी झाले.
या दिंडीत हजारो गोप्रेमी, गोसेवक, गोरक्षक, साधू-संत, विविध राजकीय व सामाजिक नेते तसेच हिंदुत्ववादी व हिंदू रक्षक कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर
सहभाग होता. गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा द्या, गोवंश हत्या बंदी कायद्याची सक्तीने अंमलबजावणी करा, गोहत्या, गोतस्करी व कत्तल पूर्णपणे बंद करण्यात यावी अशा ठोस व तीव्र मागण्यांसह आंदोलनकर्त्यांनी
शासनाचे लक्ष वेधले.
विशेष म्हणजे, गेल्या साठ वर्षांपासून सुरू असलेल्या गोसंरक्षणाच्या आंदोलनाचा हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. सोमवारी देशभरातील ५००० पेक्षा अधिक तहसील कार्यालयांवर एकाच वेळी गोहत्या बंद करो अशा प्रकारची निवेदने देण्यात आली. गोरक्षणासाठी तातडीने ठोस व प्रभावी पावले उचलावीत, या मागणीसाठी लातूर तहसील कार्यालयातही अधिकाऱ्यांना
निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात सरकारने गोहत्या बंदी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, गोतस्करी व अवैध कत्तल रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, तसेच गायला राष्ट्रमातेचा दर्जा देण्याचा निर्णय घ्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या. यासोबतच गोसंवर्धन, गोशाळांना आर्थिक सहाय्य आणि गोमातेच्या संरक्षणासाठी दीर्घकालीन धोरण आखण्याचीही मागणी करण्यात आली.मार्गातील विविध ठिकाणी नागरिकांनी दिंडीचे स्वागत करत या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या दिंडी यात्रेमुळे केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक पातळीवरही जनजागृती घडून आली असून, गोसंरक्षणासाठी एक व्यापक चळवळ उभी राहिली आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis