परभणीत हरभरा खरेदी ठप्प; ‘बजेट लिमिट एक्झीड’ संदेशामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढली
परभणी, 27 एप्रिल : सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणानंतर आता शासकीय तांत्रिक अडचणींचा फटका बसत आहे. पुष्पकेशर फार्मर प्रोड्युसर कंपनी अंतर्गत सुरू असलेल्या हरभरा खरेदी केंद्रावर पोर्टलवर ‘बजेट लिमिट एक्झीड’ असा संदेश दिसू लागल्याने ख
परभणीत हरभरा खरेदी ठप्प; ‘बजेट लिमिट एक्झीड’ संदेशामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढली


परभणी, 27 एप्रिल : सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणानंतर आता शासकीय तांत्रिक अडचणींचा फटका बसत आहे. पुष्पकेशर फार्मर प्रोड्युसर कंपनी अंतर्गत सुरू असलेल्या हरभरा खरेदी केंद्रावर पोर्टलवर ‘बजेट लिमिट एक्झीड’ असा संदेश दिसू लागल्याने खरेदी प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे केंद्रावर उपस्थित शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

शासकीय परिपत्रकानुसार 2025-26 हंगामातील हरभरा खरेदी 28 एप्रिल 2026 पर्यंत सुरू राहणार होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बारदाना (पोते) उपलब्ध नसल्याने खरेदी प्रक्रिया आधीच विस्कळीत झाली होती. दोन दिवसांपूर्वी बारदाना उपलब्ध झाल्यानंतर खरेदी पुन्हा सुरू करण्यात आली होती.मात्र, 24 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 6.30 वाजता पोर्टलवर अचानक ‘बजेट संपले’ असा संदेश दिसू लागला. त्या वेळी सुमारे 2 हजार क्विंटल हरभऱ्याच्या मालाचे बिलिंग सुरू होते. या तांत्रिक अडथळ्यामुळे खरेदी तात्काळ थांबवावी लागली.

शेतकऱ्यांमध्ये संताप

खरेदी ठप्प झाल्याने शेतकऱ्यांचा माल केंद्रावरच अडकून पडला असून आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे.

शासनाकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी

या परिस्थितीची दखल घेत पुष्पकेशर फार्मर प्रोड्युसर कंपनीने राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांना पत्र पाठवून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. बारदाना टंचाई आणि आता पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

जर ही समस्या लवकर सोडवली नाही, तर शेतकऱ्यांचा रोष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

-----------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande