
रायगड, 27 एप्रिल (हिं.स.) : आजच्या डिजिटल युगात आर्थिक साक्षरता आणि आर्थिक शिस्त अत्यावश्यक बनली असून प्रत्येक नागरिकाने उत्पन्नाचे नियोजन, खर्चावर नियंत्रण, योग्य गुंतवणूक आणि कर्जाचे जबाबदारीने व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई आणि बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 24 एप्रिल 2026 रोजी प्राथमिक शिक्षकांसाठी आयोजित ‘ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स’ (ToT) कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद रायगडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, शिक्षणाधिकारी ललिता दहीतुले, उपशिक्षणाधिकारी संतोष शेडगे, रिझर्व्ह बँकेच्या उपमहाप्रबंधक डॉ. ज्योती सक्सेना, बँक ऑफ इंडियाच्या विभाग प्रमुख दीपनविता सहानी तसेच विविध शाळांतील शिक्षक आणि बँकिंग क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले की, आर्थिक शिस्त ही केवळ बचतीपुरती मर्यादित नसून सर्वांगीण आर्थिक नियोजनाचा भाग आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून आर्थिक साक्षरतेची जाणीव निर्माण करण्यासाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. बचत, बँकिंग व्यवहार आणि शासकीय योजनांची माहिती दिल्यास जबाबदार नागरिक घडण्यास मदत होईल.
यावेळी त्यांनी प्रधानमंत्री जन धन योजना तसेच विविध विमा, पेन्शन योजना आणि डिजिटल व्यवहारांचा प्रसार करण्याचे आवाहन केले. डिजिटल व्यवहार करताना सायबर सुरक्षिततेचे नियम पाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
प्रशिक्षणाद्वारे शिक्षकांना बँकिंग व्यवहार, डिजिटल फसवणूक टाळण्याचे उपाय आणि विविध आर्थिक योजनांची माहिती देऊन सक्षम करणे हा उद्देश असल्याचे डॉ. ज्योती सक्सेना यांनी सांगितले. कार्यक्रमात रिझर्व्ह बँकेची माहिती, DICGC संदर्भातील मार्गदर्शन, खऱ्या नोटा ओळखणे आणि सुरक्षित व्यवहार यावर विविध सत्रे घेण्यात आली.
प्रशिक्षित शिक्षकांच्या माध्यमातून जिल्हाभर आर्थिक साक्षरता वाढविण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.
---------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)