
रत्नागिरी, 27 एप्रिल, (हिं. स.) : देवळे (ता. संगमेश्वर) येथे सकल हिंदू संमेलन उत्साहात पार पडले. संमेलनात संतोष जोशी आणि डॉ. जयश्री जोग यांनी आपले विचार मांडले.
हिंदू जनजागृती आणि हिंदू संघटनासाठी प्रयत्न म्हणून देवळे मंडलांतर्गत येणार्या आठ गावांचे सकल हिंदू संमेलन देवळे येथील श्री खड्गेश्वर मंदिरात रविवारी, दि. २६ एप्रिल रोजी झाले. संमेलनाचा प्रारंभ अखंड भारतमाता आणि छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला.
प्रास्ताविकात पत्रकार अमित पंडित यांनी सनातन हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदू धर्मावर प्रारंभी झालेली मुघल आक्रमणे आणि नंतर झालेली ख्रिश्चन आक्रमणे यांची माहिती दिली. हिंदू धर्म धर्मद्वेष मानत नाही, तर केवळ कर्तृत्वश्रेष्ठता आणि राष्ट्रभक्ती जाणतो, असे ते म्हणाले. हिंदू धर्माला असलेल्या सीमेपलीकडील आणि सीमांतर्गत धोक्यांची जाणीव त्यांनी करून दिली.
प्रमुख वक्ते संतोष जोशी यांनी हिंदू धर्मासामोरील आव्हानांविषयी मार्गदर्शन केले. हिंदू हा केवळ एक धर्म नाही तर ती जीवन जगण्याची पद्धती असल्याचे ते म्हणाले. ही संस्कृती अधिकारापेक्षा कर्तव्यावर भर देते. तसेच संत आणि योद्धे यांनी सर्वस्व अर्पण करून ही संस्कृती टिकवली असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय चारित्र्याचा अभाव, अतिसहिष्णुता यामुळे या संस्कृतीची अधोगती झाल्याचे ते म्हणाले.
डॉ. जयश्री जोग यांनी कुटुंब व्यवस्थेवर भर दिला. परकीयांच्या आक्रमणांमुळे आपली कुटुंबव्यवस्था धोक्यात आल्याचे त्या म्हणाल्या. कुटुंबातला संवाद संपल्यामुळे ही व्यवस्था धोक्यात आल्याचे सांगून संवादाची गरज त्यांनी व्यक्त केली.
पत्रकार प्रकाश चाळके यांनी हिंदू संघटनाची गरज व्यक्त केली. धर्माविषयी एकत्र येण्याची गरज असताना ती अन्य धर्मात पूर्ण होते, पण हिंदू धर्मात तिचा अभाव असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
संयोजक दिलीप शिर्के यांनी जातीपातींच्या राजकारणावर टीका केली. जातीपातींच्या पलीकडे जाऊन राष्ट्रहिताचा विचार करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. जातनिहाय जनगणना ही समाजात फूट निर्माण करणारी असल्याचे ते म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी