
रायगड, 27 एप्रिल (हिं.स.)। राज्यात एप्रिल-मे महिन्यात तापमान सातत्याने वाढत असून अनेक ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट जाणवत आहे. सकाळपासूनच उन्हाचा कडाका वाढत असल्याने दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे कठीण होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघात, निर्जलीकरण, अशक्तपणा, चक्कर येणे, मळमळ यांसारख्या समस्या वाढत असून नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे झाले आहे.
उष्माघात हा गंभीर वैद्यकीय आपत्कालीन प्रकार ठरू शकतो. शरीराचे तापमान झपाट्याने वाढल्याने शरीराला स्वतःला थंड ठेवणे शक्य होत नाही. वेळेत उपचार न मिळाल्यास जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. तीव्र तहान, गरगरणे, त्वचा गरम होणे, गोंधळ, बेशुद्धावस्था ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत.
तज्ज्ञांच्या मते, पुरेसे पाणी पिणे हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. ओआरएस, लिंबूपाणी, ताक, नारळपाणी यांचा आहारात समावेश करावा. तसेच टरबूज, काकडी, द्राक्षे यांसारखी पाण्याने समृद्ध फळे खावीत. हलके, सुती व फिकट रंगाचे कपडे वापरणे, बाहेर पडताना टोपी, छत्री यांचा वापर करणे आवश्यक आहे.
दुपारी 12 ते 3 या वेळेत उन्हात जाणे टाळावे, अति श्रम करू नयेत तसेच चहा, कॉफी, थंड पेये कमी प्रमाणात घ्यावीत. लहान मुले, वृद्ध, गर्भवती महिला आणि आजारग्रस्त व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी.
उष्माघाताची लक्षणे दिसल्यास संबंधित व्यक्तीला त्वरित सावलीत नेऊन थंड पाण्याने शेक द्यावा आणि तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत. साध्या उपायांनी उष्माघात टाळता येऊ शकतो, त्यामुळे “पाणी प्या, उन्हापासून बचाव करा आणि सुरक्षित राहा” असे आवाहन करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)