
कोल्हापूर, 27 एप्रिल (हिं.स.) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (केडीसीसी) घरगुती सौर ऊर्जा प्रकल्पांना चालना देण्यासाठी ‘पी. एम. सूर्यघर’ योजनेअंतर्गत अल्प व्याजदरात कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमुळे जिल्हाभरात सौर ऊर्जा प्रकल्प प्रभावीपणे राबवले जाणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
मंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बँकेच्या संचालक मंडळ बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. बैठकीत बँकेला गेल्या आर्थिक वर्षात 287 कोटी रुपयांचा उच्चांकी ढोबळ नफा झाल्याची माहिती देण्यात आली. याबद्दल विकास सेवा संस्थांच्या सचिवांना तीन कोटी रुपयांचे तर बँक कर्मचाऱ्यांना चार कोटी रुपयांचे बक्षीस देण्याचा निर्णयही घेण्यात आला.
ग्रामीण भागालाही सौर ऊर्जेचा लाभ
या कर्ज धोरणाअंतर्गत जिल्ह्यातील रहिवाशांना स्वतःच्या घरावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. शासनाकडून 1 किलोवॅटसाठी 30 हजार, 2 किलोवॅटसाठी 60 हजार आणि 3 किलोवॅट व त्यापेक्षा अधिक क्षमतेसाठी 78 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.
मात्र भांडवलाअभावी ग्रामीण भागातील अनेक नागरिक या योजनेपासून वंचित राहिल्याचे लक्षात घेऊन बँकेने पुढाकार घेतला आहे.
अल्प हप्त्यात ‘शून्य वीज बिल’चा दावा
बँकेच्या नव्या ‘सूर्यशक्ती कर्ज धोरणा’नुसार कमी व्याजदरात कर्ज देण्यात येणार आहे. प्रारंभी तीन वर्षे ग्राहकांना जवळपास वीज बिलाएवढाच हप्ता भरावा लागणार असून त्यानंतर पुढील 25 ते 30 वर्षे मोफत वीज मिळण्याचा दावा करण्यात आला आहे.
1 किलोवॅट प्रकल्प: 6 टक्के व्याजदर, मासिक हप्ता 793
रुपये
2 किलोवॅट प्रकल्प: 7 टक्के व्याजदर, मासिक हप्ता 2007 रुपये
3 किलोवॅट व अधिक: 8 टक्के व्याजदर, मासिक हप्ता 3353 रुपये
पर्यावरणपूरक जिल्ह्याच्या दिशेने पाऊल
हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली असून यामुळे वीज खर्च कमी होऊन पर्यावरण संरक्षणालाही चालना मिळेल. कोल्हापूर जिल्हा अपारंपरिक ऊर्जा निर्मितीत राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीला बँकेचे उपाध्यक्ष, आमदार, माजी खासदार, माजी आमदार तसेच विविध पदाधिकारी आणि कर्मचारी प्रतिनिधी उपस्थित होते.
-------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar