
रायगड, 27 एप्रिल (हिं.स.)।कर्जत तालुक्यात सुरू असलेल्या व प्रस्तावित धरणे आणि जलविद्युत प्रकल्पांविरोधात पर्यावरणप्रेमींनी आता थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. येत्या ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत कर्जत ते मंत्रालय असा पायी मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
कर्जत येथील शनी मंदिर परिसरात झालेल्या बैठकीत जनहित याचिका दाखल करण्यासाठी निधी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मे महिन्यात कर्जत प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचेही ठरवण्यात आले आहे. या घडामोडींमुळे कर्जत तालुक्यात शासनाविरोधातील नाराजी तीव्र होत असून हा प्रश्न राज्यस्तरावर गाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कर्जत हा निसर्गसंपन्न व ‘ग्रीन झोन’ म्हणून ओळखला जाणारा तालुका आहे. मात्र पोशीर, शिलार, कोंढाणा धरण, टाटा जलविद्युत प्रकल्प तसेच टोरेंट कंपनीचा सुमारे ३००० मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प अशा अनेक योजनांमुळे या भागातील पर्यावरणीय संतुलन धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. या प्रकल्पांसाठी हजारो एकर जमीन संपादित होणार असून शेती, गावे, वने आणि स्थानिकांचा सांस्कृतिक वारसा बाधित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
टोरेंट प्रकल्पासाठी सुमारे ९३२ एकर जमीन आवश्यक असून त्यापैकी सुमारे ६०० एकर क्षेत्र वनक्षेत्रात येते. हा भाग भीमाशंकर अभयारण्यालगत असल्याने जैवविविधतेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. हजारो झाडांची तोड, भूजल पातळी घट आणि पर्यावरणीय असंतुलन याबाबत स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
पोशीर व शिलार धरणांसाठी अनुक्रमे ६,३९४ कोटी आणि ४,८६९ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर झाले असले तरी पुनर्वसन, जमीन मोबदला आणि पर्यावरणीय जनसुनावणीबाबत स्पष्टता नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. काही प्रकल्पांची कामे पर्यावरणीय प्रक्रिया पूर्ण न करताच सुरू केल्याचा आरोपही पुढे येत आहे.
दरम्यान, पाली-भूतिवली धरणाला ४० वर्षे उलटूनही अपेक्षित लाभ मिळाला नसल्याची टीका होत आहे, तर कोंढाणा धरणाचे काम दीर्घकाळापासून रखडले आहे. “या प्रकल्पांचा प्रत्यक्ष फायदा कर्जतकरांना होत नाही. पाणी व वीज महानगरांकडे वळवली जाते. स्थानिकांचा बळी देऊन बाहेरील भागाचा विकास केला जात आहे,” असा आरोप ॲड. कैलास मोरे यांनी केला.
एकंदरीत, पर्यावरण, स्थानिक हक्क आणि विकास यांच्यातील समतोलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून ५ जूनचा पायी मोर्चा हा या संघर्षाला नवे वळण देणार, हे स्पष्ट होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)