
छत्रपती संभाजीनगर, 27 एप्रिल (हिं.स.)।
विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या संभाव्य नावांची जोरदार चर्चा सुरू असून संजय केणेकर आणि कैलास गोरंट्याल यांची नावे आघाडीवर आहेत. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केणेकर यांना आधी ११ महिन्यांचा कालावधी मिळाल्याने त्यांना संधी द्यायची, की जालना महापालिका एकहाती खेचून आणणाऱ्या कैलास गोरंट्याल यांना संधी द्यायची, यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
राज्यातील विधान परिषदेच्या दहा जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून भाजपकडून आमदार संजय केणेकर, सिल्लोडचे सुरेश बनकर, जालन्याचे कैलास गोरंट्याल याची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. यापैकी कुणाला संधी मिळते की पक्ष पुन्हा धक्कातंत्र वापरेल, याची जोरदार चर्चा आहे. विद्यमान आमदार केणेकर यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागेसाठी जोरदार लाँबिग सुरू आहे. केणेकर यांना मुळातच आमदारकीचा पूर्ण कालावधी न मिळाल्याने एक पूर्ण टर्म मिळावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यानुसार त्यांनी फिल्डिंगही लावली आहे. मात्र, यावेळी जालन्यातूनही प्रबळ नाव समोर आले आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis