
बीड, 27 एप्रिल (हिं.स.)।
बीडसह संपूर्ण राज्यातील नागरिकांना वाढत्या उन्हापासून दिलासा देण्यासाठी महावितरणने मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीच्या कामांच्या वेळेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे. मुख्यालयाने दिलेल्या नव्या आदेशानुसार, ही कामे आता दुपारी करण्याऐवजी सकाळी ७ ते ११ या वेळेतच पूर्ण केली जातील. पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी सध्या राज्यभरात यंत्रणेच्या सक्षमीकरणाचे काम वेगात सुरू आहे. मात्र दुपारी वीज नसल्यामुळे ग्राहकांना होणारा त्रास टाळण्यासाठी प्रशासनाने हा संवेदनशील निर्णय घेतला. या कामांमध्ये प्रामुख्याने झाडांच्या फांद्या तोडणे, रोहित्रांची देखभाल, खराब इन्सूलेटर्स आणि वीजखांब बदलणे अशा विविध तांत्रिक कामांचा समावेश आहे. संबंधित भागातील ग्राहकांना एसएमएसद्वारे पूर्वसूचना देऊन आणि शक्य तिथे पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध करून ही कामे पूर्ण करण्याचे निर्देश क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहेत. मे अखेरपर्यंत ही सर्व कामे पूर्ण करण्याचे महावितरणचे नियोजन असून यामुळे पावसाळ्यातील तांत्रिक बिघाड कमी होण्यास मदत होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis